आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Staff Strike Continues Still No Solution

मनपा कर्मचार्‍यांचा संप अद्यापही सुरूच- तोडगा नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-महापालिका कर्मचार्‍यांनी 10 जानेवारीपासून पुकारलेला संप अजूनही सुरूच आहे. कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने 24 जानेवारी या पंधराव्या दिवशी संप कायमच आहे. या संपाची राज्य शासनानेही गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे संघर्ष समिती संप मागे घेण्यास तयार नाही. दरम्यान, 26 जानेवारीला असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संपावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाच महिन्यांचे वेतन, निवृत्तिवेतन आणि पाचव्या वेतन आयोगानुसार देण्यात येणार्‍या वेतनाच्या फरकाची रक्कम या तीन प्रमुख मागण्यांसाठी हा संप करण्यात आला आहे. संपामुळे नागरी सुविधांवर आणि महापालिकेतील कामकाजावरही परिणाम झाला आहे. 24 जानेवारीला कर्मचार्‍यांनी कोणतीही द्वार सभा घेतली नाही तसेच महापालिकेतील एकही कार्यालय उघडले गेले नाही. संपावर तोडगा काढण्यासाठी राजकीय तसेच प्रशासकीय स्तरावर प्रयत्न झाले. मात्र ते प्रयत्न महापालिकेची तिजोरी रिकामी असल्याने व्यर्थ गेले. पाचपैकी दोन महिन्यांचे थकित वेतन व निवृत्तिवेतन या महिन्याच्या अखेरपर्यंत देण्यास प्रशासन तयार होते. मात्र, ही भूमिका कर्मचार्‍यांना मान्य नसल्याने संप मागे घेतला नाही. यापूर्वी राज्य शासनाने वेतनासाठी 16 कोटी रुपये दिले होते. शासन वेतनासाठी सतत पैसे देण्यास तयार नसल्याने महापालिकेसमोर समस्या आहे.

स्थानिक संस्था कर लागू झाल्याने महापालिकेला जकात करातून मिळणारे उत्पन्न बंद झाले, त्यामुळे कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्यात अपयश येत आहे.