आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला : संपत्तीच्या वादातून नातवाने आजी-आजोबांवर केलेल्या हल्ल्यातील आजीचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरा लगतच्या अमानतपूर ताकोडा येथे एप्रिलच्या रात्री आजोबा आणि आजी झोपलेली असताना, नातवाने अचानक कुऱ्हाडीने त्यांच्यावर हल्ला चढवला. यात आजोबा गोविंदा धन्नाजी मोरे (७५) झोपेतच गतप्राण झाले, तर आजी आशाबाई (६०) गंभीर जखमी झाली होती. सोमवार, २० एप्रिलला विदर्भ रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी आता दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

गोविंदा आणि त्यांची तिसरी पत्नी आशाबाई हे दोघेच सोबत राहत होते. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलीला सचिन वाल्मीक खंडारे (वय २०) नावाचा मुलगा आहे. त्याच्यामध्ये आणि गोविंदा मोरे यांच्यामध्ये संपत्तीच्या वादातून भांडणे आहेत.

एप्रिलला त्यांच्यातील वाद पराकोटीला पोहोचला. सचिन खंडारे हा रविवारी अकोल्यात आला होता. रात्री तो पायीच अकोल्याहून अमानतपूर ताकोड्याला पोहोचला. रात्री दोन वाजता घरातील कुऱ्हाड घेतली आणि आजोबा गोविंदा मोरे यांच्या घरी पोहोचला. त्याने झोपेत असलेल्या गोविंदा आणि त्यांची पत्नी आशाबाई यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यात आजोबाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आजी गंभीर जखमी झाली होती. जखमी असलेल्या आशाबाई यांना सुरुवातीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना आयकॉन हॉस्पिटलमध्ये हलवले. तिथून विदर्भ रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

संपत्तीच्या वादातून खून

आशाबाईयांचे पती गोविंदा मोरे एसटी बसमध्ये चालक होते. आशाबाई या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.गोविंदा यांची पहिली पत्नी गावातच त्यांच्यापासून वेगळी राहते. तिला एक मुलगी आहे आणि त्या मुलीला एक सचिन नावाचा मुलगा आहे. त्याच्यामध्ये आणि गोविंदा मोरे यांच्यात संपत्तीवरून वाद होता, तर गोविंदा यांच्या दुसऱ्या पत्नीचे निधन झाले होते. संपत्तीच्या वादातून हा प्रकार घडला.

तर दोघेही वाचले असते

सचिन खंडारे याच्याविरुद्ध त्याचे आजोबा गोविंदा मोरे यांनी डाबकी रोड पोलिसात काही दिवसांपूर्वीच तक्रार दिली होती. सचिन हा त्यांना शिवीगाळ आणि नेहमी मारहाण करत असल्याचा उल्लेखही त्यांनी तक्रारीत केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवर काहीही कारवाई केली नसल्याची माहिती आहे. त्या तक्रारीची वेळीच दखल घेतली गेली असती तर या दोघांचेही प्राण वाचले असते.