आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती वादातून पत्नीची हत्या, जेतवननगरातील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- वडिलांनी मुलीची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याच्या कैलास टेकडी परिसरातील घटनेची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा खदान परिसरातील जेतवननगरात पतीने पत्नीची हत्या केली. रविवारी रात्री पत्नी झोपेत असताना पतीने तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी 20 जानेवारीला ही घटना उघडकीस आली.

यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप विजय शिंदे (35) हा जेतवननगरात भाड्याच्या घरात तीन वर्षांपासून राहत आहे. तो मातकाम करतो. सहा वर्षांपूर्वी त्याचा विवाह बार्शिटाकळी तालुक्यातील सावरखेड येथील अर्चनासोबत झाला. त्यांना अडीच वर्षांची संजीवनी नावाची मुलगी आहे. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री हे तिघे झोपी गेले. रात्रीच्या सुमारास दिलीपने लोखंडी हातोड्याने पत्नी अर्चना (28) हिच्या डोक्यावर वार केले. यामध्ये तिचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर दिलीपने पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास शेजार्‍यांना दार ठोठावून उठवले आणि ‘मुलीकडे लक्ष द्या, मी येतोच’, असे सांगून तो बाहेर गेला.

काही वेळाने तो परत आला आणि मुलीचे रक्ताने .माखलेले कपडे त्याने बदलवले. त्यानंतर त्याने ‘मुलीकडे लक्ष ठेवा, मी बायकोला मारले आहे’, असे शेजार्‍यांना सांगितले. मात्र, घरात अंधार असल्यामुळे शेजार्‍यांना घरातील काही दिसले नाही. त्यानंतर संजीवनी रडू लागल्याने घडलेला प्रकार शेजार्‍यांच्या लक्षात आला. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर खदानचे ठाणेदार शैलेंद्र सपकाळ हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या वेळी घटनास्थळावरून पोलिसांनी रक्ताने माखलेले कपडे व लोखंडी हातोडा जप्त केला. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता अर्चनाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात पाठवला.


दरम्यान, अर्चनाचा भाऊ संघपाल मधुकर अंभोरे यांनी याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ‘दिसायला सुंदर नाही, तू मला पसंत नाही, तुझ्याशी लग्न करून महा पश्चात्ताप झाला, असे म्हणून दिलीप तिचा छळ करत होता. याच कारणावरून लोखंडी हातोड्याने माझ्या बहिणीला त्याने ठार मारले’, असे अंभोरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम 302 नुसार दिलीप विजय शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील संशयित आरोपी दिलीप शिंदे फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मुलगा भित्रा आहे
आम्ही भीमनगरात राहतो. दिलीप पाच-सहा वर्षांपासून जेतवननगरात राहतो. मला दोन मुले आहेत. त्यांची लग्न झालेली आहे. एक मुलगा आमच्याजवळ राहतो. दिलीप खुप भित्रा मुलगा आहे. कोणत्याही प्रकारचे त्याला व्यसन नाही. त्यामुळे त्याने असं का केलं, हेच समजत नाही.’’ शशिकला विजय शिंदे, आरोपीची आई

कधी वाद नव्हता : शेजारी महिला
आम्ही दहा वर्षांपासून येथे भाड्याने राहतो. दिलीप शिंदे तीन वर्षांपूर्वी आमच्या शेजारी राहण्यास आले. त्यांच्यात कधी नवरा-बायकोचे भांडण नव्हते. ते दारूही पित नव्हते. रात्री अचानक त्यांनी दार ठोठावून आम्हाला उठवले. मुलीकडे लक्ष ठेवा म्हणून बाहेर गेले. बाहेरगावी जात असेल म्हणून ऑटोरिक्षा आणण्यास गेले असावा, असे आम्हाला वाटले. मात्र, काही वेळाने ते परत आले. त्यांची मुलगी रडत होती. नंतर त्याने तिचे कपडे बदलले. अंधारामुळे बरोबर दिसले नाही. मात्र मी बायकोला मारले आहे आणि तुम्ही मुलीवर लक्ष ठेवा, असे म्हणून ते गेटवरून उडी मारून निघून गेले.