आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्याजवळ सरपंचाची गोळ्या घालून हत्या, राजकीय वैमनस्यातून खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अकोला शहरापासून जवळच असलेल्या मलकापूर येथील सरपंच व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश्वर देशमुख यांची शुक्रवारी भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. राजकीय वैमनस्यातून त्यांचा खून करण्यात आल्याचे सांगितले जाते.

सिद्धेश्वर देशमुख मित्रासोबत मलकापूर येथून संत तुकाराम चौकाकडे निघाले. या वेळी दोन जण दुचाकीने आले. त्यांनी देशमुख यांना थांबवत वाद घातला. वादाचे पर्यवसान सशस्त्र हल्ल्यात झाले. देशमुख यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे ते जवळच असलेल्या ठाकूर यांच्या घराकडे पळाले. ठाकूर यांच्या घराबाहेर ते पडले. या वेळी त्यांच्यावर जवळून गोळीबार केला गेला, असे पोलिसांनी सांगितले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली होती.

घटनेची पार्श्वभूमी...
दहा वर्षांपासून अकोल्यापासून नजीकच असलेल्या मलकापूर ग्रामपंचायतमध्ये राजकीय धुसफूस सुरू आहे. चार महिन्यांपूर्वीही केबल टाकण्यावरून वाद झाला होता. या वेळी बबलू मार्कंडवर प्राणघातक हल्ला केला गेला. याप्रकरणी सरपंच सिद्धेश्वर देशमुखसह त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. या राजकीय वैमनस्यातूनच हे हत्याकांड घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलिसही तपास करत आहेत.

आरोपींना अटक करू
सिद्धेश्वर देशमुख यांच्यावर गोळीबार झाला आहे. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी दिली.

शवविच्छेदनापूर्वी वैद्यकीय चाचण्या
हत्याकांडाचे गांभीर्य लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व पोलिसांच्या संमतीनेच शवविच्छेदन करण्यात येईल. परवानगी मिळाल्यास रात्री अन्यथा शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येईल. डॉ.हुसेनी यांच्यावर शवविच्छेदनाची जबाबदारी देण्यात आली आहे. देशमुख यांच्या डोक्याचा एक्सरे व आदी चाचण्या करण्यात येणार आहेत.
- डॉ.जी.जी.राठोड, वैद्यकीय अधीक्षक,सर्वोपचार रूग्णालय अकोला.