आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘संगीतामुळे मला जीवनाचा सूर गवसला’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गुरुदेव सेवा मंडळाचे संस्कार आणि गुरुजनांच्या आशीर्वादामुळे संगीताची उपजत आवड विकसित होत गेली. लहानपणी गुरुदेवांची भजने म्हणत असे. हार्मोनियमही वाजवू लागलो. पुढे तर हे वाद्य चरितार्थाचे साधन झाले. संगीतामुळेच जीवनाचा सूर गवसला, अशी भावना रामेश्वर नामदेव म्हसाळ (गुरुजी) यांनी दैनिक ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

अकोल्याला 1984-85 मध्ये चित्रा टॉकिजजवळ टी. टी. गंगासागर यांचे हार्मोनियम दुरुस्तीचे दुकान होते. गंगासागर काकांकडे जाऊन बसत असे, त्यातून स्वराची ओळख होऊ लागली. वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये पेटी कशी तयार करायची, यासाठी स्वरज्ञान आवश्यक होते. संगीत तज्ज्ञांकडून ते मिळवले. सूरमणी कै. शकुताई पळसोकर, कै. आळशी, नथूरामजी जयस्वाल, वावगे यांच्यामुळे संगीताची जाण वाढीस लागली. नांदुर्‍याला रमेश दाणी यांची भेट झाली. ते उत्तम हार्मोनियम वादक तसेच त्यांचे ट्युनिंगही छान होते. आपणही उत्तम कारागीर व्हावे, असे वाटू लागले. घरची परिस्थिती यथातथाच होती. अकोल्यात लहानमोठी कामे करून पोट भरावे लागायचे. परंतु, त्यात स्थायित्व नव्हते. गुरुदेव सेवा मंडळात भजने म्हणत असल्यामुळे चांगल्या लोकांशी परिचय झाला. दीपक चौकात चिमणकर यांचे वाद्य दुरुस्तीचे दुकान होते. रामलाल काका यांच्याकडे हार्मोनियम कारागीर होण्याविषयी शब्द टाकला, तर त्यांनी वेगळाच सल्ला दिला. परंतु, जिद्द हारलो नाही. कसेही करून या क्षेत्रातच जम बसवायचा असे ठरवले. पूर्वी लोकांकडे जाऊन हार्मोनियम दुरुस्तीची कामे करीत असे. त्यानंतर आता राऊतवाडीमध्ये पुंडलिकबाबा आश्रमाच्या बाजूला दुकान थाटले आहे. गजल नवाज भीमराव पांचाळे, अकोल्याचे प्रा. अनिरुद्ध खरे, अंबुसकर, मिलिंद सभापतीकर, देवेंद्र देशमुख यांची कामे आपल्याकडेच येतात. तसेच मनसेनेही कलावंत म्हणून गौरव केला, असे आनंदाचे क्षण अनुभवल्याचे म्हसाळ यांनी सांगितले. ग्रामगीतेवर श्रद्धा असल्याने गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्याला साहाय्य करतो, असे त्यांनी सांगितले.