आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रध्वज सन्मान अभियान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-प्रजासत्ताकदिनानिमित्त सर्वत्र कागदी, प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीसाठी आले आहेत. मात्र, अनेकदा विद्यार्थी, पालकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून अनवधानाने त्याचा अवमान होताना दिसून येतो. राष्ट्रध्वज विकत घेतल्यानंतर प्रत्येकाकडून त्याचा सन्मान राखला जावा, यासाठी दैनिक दिव्य मराठीने ‘राष्ट्रध्वज सन्मान जनजागृती अभियान’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात प्रत्येकाने राष्ट्रध्वज जमिनीवर पडू न देता त्याचा सन्मान राखण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी केल्यावर डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभावना वाढीस लावतो. अंतराळात झेपावणार्‍या अवकाशयानावर असलेला राष्ट्रध्वज, सर्वच शासकीय इमारतींवर डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज आपली अस्मिता आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी मुलांवर संस्कार करत तो जपणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन या दोन राष्ट्रीय दिनाच्या पार्श्वभूमीवर हाती राष्ट्रध्वज घेऊन मिरवणारी मुले, चेहर्‍यावर स्टिकर लावत देशप्रेमाची भावना व्यक्त करणार्‍या व्यक्ती आनंदाने राष्ट्रीय दिन साजरे करतात. परंतु, राष्ट्रध्वजाचा हा सन्मान एका दिवसासाठी न दर्शवता तो निरंतर ठेवण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वज सन्मान जनजागृती अभियानात प्रत्येकाने सहभागी व्हावे. राष्ट्रध्वज फाटू नये, तो खाली पडू नये, गाडीवर लावल्यानंतर तो उडून जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. यासाठी या राष्ट्रध्वज सन्मान जनजागृती अभियानात प्रत्येकाने सहभागी होत प्रत्येकाने आपापल्यापरीने त्यामध्ये योगदान द्यावे.
राष्ट्रध्वज सन्मान अभियान

राष्ट्रध्वजाचा मान पहिला

राष्ट्रध्वजाचा माझ्या जीवनात पहिला मान आहे. स्वतंत्र भारताचा तिरंगा लाल किल्ल्यावर डौलत फडकवण्याचे स्वप्न पाहणार्‍यांनी त्यासाठी स्वातंत्र्यलढय़ात प्राणांची आहुती दिली. तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा. ‘दिव्य मराठी’च्या या अभियानात प्रत्येकाने सहभागी व्हावे, राष्ट्रध्वजाचा सन्मान प्रत्येकाने आपल्या कृतीतून वाढवावा. डॉ. उत्कर्ष गुटे, प्रभारी आयुक्त, महापालिका, अकोला.

अभियानात प्रत्येकाचा सहभाग आवश्यक

विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी पालक, शिक्षकांनी त्यांना संस्कारित केले पाहिजे. यासाठी राष्ट्रध्वजाची महती प्रत्येक शाळेत सांगणे आवश्यक आहे. या अभियानातून विद्यार्थ्यांमधील देशभावना वाढीस लागण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे महत्त्व लक्षात येईल. या अभियानात शहरासह जिल्ह्यातील शाळा, विद्यार्थी व शिक्षकांनी पुढाकार घ्यायला हवा. अशोक सोनवणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, अकोला

राष्ट्रध्वज सर्वांसाठी वंदनीय

देशाचा राष्ट्रध्वज हा प्रत्येकासाठी वंदनीय आहे. त्यासमोर नतमस्तक व्हायला हवे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यासह नागरिकांनी त्यासाठी प्रयत्न करण्याची आणि शाळांनी यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. दैनिक दिव्य मराठीच्या या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रध्वज सन्मानासाठी प्रयत्न होत आहेत,ही चांगली बाब आहे. प्रफुल्ल कचवे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, अकोला.