आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांनीच जपावा राष्ट्रध्वज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कागदी/प्लास्टिक ध्वजांची विक्री करताना ते इतरत्र पडणार नाहीत, फाटणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. आपला राष्ट्रध्वज सन्मानाने हाताळा, असे प्रत्येक ग्राहकाला सांगितले जाईल, असा संकल्प ध्वजविक्रेत्यांनी केला. ‘दिव्य मराठी’च्या ‘राष्ट्रध्वज सन्मान’ अभियानात शहरातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, शिक्षक व विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्याने राष्ट्रध्वजाच्या सन्मानाविषयी जनजागृती झाली आहे. शनिवारी ध्वजविक्रेत्यांनीदेखील सकारात्मक पुढाकार घेत याची जबाबदारी उचलली. ध्वजविक्री तर करावीच लागणार. मात्र, हे करतानाच ध्वजाचा अवमान होणार नाही, यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

तिरंगा देशाची शान
तिरंगा आपल्या देशाची शान आहे. त्याचा कोणत्याही प्रकारे आणि कधीही अवमान होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. मात्र, आज या गोष्टी केवळ नावालाच उरल्या आहेत. राष्ट्रध्वजाचा अवमान अनवधानानेही होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहीजे.’’ सुशांत चिपटे, ध्वज विक्रेता, पंचायत समितीजवळ

ध्वज लावून दाखवतो
लहान मुलांना ध्वज सरळ लावायला सांगतो. त्यांना सरळ म्हणजे कसा हे लक्षात आले नाही, तर त्यांना मी स्वत: ध्वज लावून दाखवतो. ध्वज लावताना पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी माझा यापुढेही नेहमीच प्रयत्न राहील.’’ मंगेश सुरजुसे, ध्वज विक्रेता, जुना अग्रसेन चौक

प्लास्टिकचा ध्वजच ठेवत नाही
राष्ट्रध्वजाचा अवमान आम्हाला मान्य नाही. मी प्लास्टिकचा राष्ट्रध्वज कधीच विकत नाही. माझ्याकडे केवळ कागदी ध्वज असून, त्याचा अवमान होणार नाही, अशी खबरदारी मी विशेषत्वाने लहान मुलांना विक्री करताना घेतो. ध्वज खाली पडू नये हे वारंवार सांगतो.’’ कृष्णा पाटील, ध्वज विक्रेता, टॉवर चौक

ध्वजाची काळजी घेण्यास सांगतो
राष्ट्रीय सणांच्या दिवशी मुलांनी शर्टाला लावलेला ध्वज खेळताना खाली पडणार नाही याची काळजी घ्यायला मी मुलांना सांगतो. तसेच कोणाकडून ध्वज खाली पडल्यास किंवा कुठेही खाली पडलेला ध्वज दिसल्यास तो उचलून ठेवावा, असेही मुलांना सांगत असतो. राष्ट्रध्वज सन्मानासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन.’’ गोपाल लाहे, ध्वज विक्रेता, जुना अग्रसेन चौक

पैशांसाठी ध्वज विकत नाही
माझा व्यवसाय असला तरी मी केवळ पैसे मिळवण्यासाठीच राष्ट्रध्वज विकत नाही. माझ्याकडे अनेक लहान मुले अशी येतात ज्यांच्याकडे पैसे नसतात. अशावेळी त्यांना मी मोफतच ध्वज देतो. ध्वज मिळाल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून मला समाधान वाटते.’’ शांताराम नेमाडे, ध्वज विक्रेता, जुना अग्रसेन चौक

आम्ही अवमान होऊ देत नाही
15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला राष्ट्रध्वज अनेक जण खिशाला लावतात. वाहनांवरही ध्वज लावून देशप्रेम व्यक्त करतात. मात्र, मुलांकडून अजाणतेपणाने होणारी राष्ट्रध्वजाची अवहेलना वेळीच थांबली पाहिजे. त्यासाठी आम्ही विक्री करताना माहिती देतो.’’ प्रदीप राजुरकर, ध्वज विक्रेता, शिवाजी महाविद्यालयाजवळ

तिरंगा स्वातंत्र्याची शान
राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची जाणीव होते. तिरंगा म्हणजे स्वातंत्र्याची शान आहे. त्यामुळे ती प्रत्येकाने टिकवून ठेवणे गरजेचे आहे.’’ नंदकिशोर पाटील, ध्वज विक्रेता, खदान