आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नेट’च्या जमान्यात टपाल खात्याचा नेटका कारभार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - इंटरनेट प्रणाली, मोबाइलची सुविधा आणि कुरिअर सेवेचा विस्तार वेगाने होत असतानाही दीर्घकाळापासून सर्वसामान्यांना संदेशवहनासह विविध सुविधा पुरवणार्‍या टपाल विभागाने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. एवढेच नव्हे तर काळानुरुप विविध सेवा व योजनांमध्ये बदल करून, नवीन योजना राबवून नागरिकांचा आपल्याकडील कल वाढवण्यात आणि असलेला विश्वास भक्कम करण्यातही बहुतांशी यश मिळवले आहे. यामुळेच या टपाल विभागाचे महत्त्व अबाधित राहिले आहे.

भारतातील टपाल सेवेचे जाळे जगात सर्वात मोठे म्हणून ओळखले जाते. देशातील शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे दोन लाख कार्यालयांच्या माध्यमातून संदेशवहनासह विविध प्रकल्प चालवले जात आहेत. अकोला विभागात अकोला आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. अकोला विभागातील शहरी भागात 46 टपाल कार्यालये आहेत, तर ग्रामीण भागात 354 कार्यालयांच्या माध्यमातून कामकाज चालवले जात आहे. नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी अकोला विभागात एक हजार 100 कर्मचारी कार्यरत आहेत. सर्वसामान्यांच्या दारापर्यंत जाऊन पत्रे किंवा इतर कागदपत्रे पोहोचवण्यासाठी 82 पोस्टमन कार्यरत आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना तसेच नागरी व ग्रामीण भागाचा विस्तार होत असतानाही त्या तुलनेत टपाल विभागातील कर्मचारी संख्या मात्र फारशी वाढली नाही. मात्र, काळजीपूर्वक नियोजन करत उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या आधारे सर्वसामान्यांना सेवा पुरवण्यासाठी या विभागाद्वारे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच परिणाम म्हणून दीर्घकाळापासून नागरिकांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यात हा विभाग यशस्वी ठरला आहे.

स्पीड पोस्ट सेवा, एक्स्प्रेस पार्सल सेवा, वीज बिल भरण्याची सुविधा, टेलिफोन बिल भरण्याची सुविधा आदी सुविधांच्या माध्यमातून टपाल विभाग सर्वसामान्यांशी थेट जोडला गेला आहे. तारसेवा बंद केली असली तरी त्याला पर्याय म्हणून ई-पोस्ट सुविधा उपलब्ध आहे. या सेवेच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना तारेच्या सुविधेप्रमाणेच आणि जलदतेने सेवा प्राप्त करून दिली जात आहे. कुरिअर सेवेप्रमाणे टपाल विभागाची एक्स्प्रेस पार्सल सेवा जलद गतीची ठरत आहे. वीज किंवा टेलिफोन बिलांच्या स्वीकृतीप्रमाणेच पाण्याचे किंवा इतरही प्रकारची बिले स्वीकारण्याचे काम टपाल कार्यालयांमध्ये केले जाते. या अनुषंगाने या विभागाची बिल मेल सर्व्हिसही कार्यरत आहे. सर्वसामान्यांना टपाल विभागाद्वारे मोबाइल मनिऑर्डर, पोस्टल बँकिंग आणि एटीएम सेवेचाही लाभ मिळणार आहे. याशिवाय इतरही सेवा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहेत.

आर्थिक गुंतवणुकीच्या योजना : सर्वसामान्यांसाठी टपाल विभागाच्या विविध आर्थिक गुंतवणुकीच्या योजना उपलब्ध आहेत. राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांच्या गुंतवणुकीच्या योजना आणि व्याजदराचे प्रमाण आकर्षक असले तरी या विभागाच्या योजनांमध्येही गुंतवणूक करणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. अकोला विभागातही टपाल विभागाच्या विविध योजनांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याचे सर्वसामान्यांचे प्रमाण वाढतेच राहिले आहे. आरडी, टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा आदी योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना आर्थिक लाभ दिला जातो. खात्रीशीर गुंतवणुकीसाठी टपाल विभागाकडेच अनेकांचा कल आहे. त्यामुळे विविध गुंतवणूक योजनांना सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आकर्षक सेवा : विविध प्रकारच्या सेवांप्रमाणेच टपाल विभागाद्वारे ‘फिलॅटेली’ सेवाही दिली जात आहे. टपाल विभागाद्वारे काढण्यात येणार्‍या तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद अनेकजण जोपासतात. अशा रसिकांना विविध प्रकारची टपाल तिकिटे घरपोच मिळावी, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 200 रुपये शुल्क जमा केल्यास टपाल विभागाकडून काढण्यात येणारी तिकिटे संबंधित व्यक्तीला घरपोच पाठवली जातात. अकोला विभागात काहीजण या सेवेद्वारे तिकिटे जमवून संग्रह करत आपला छंद जोपासत आहेत.

‘टपाल दिन’ का? : 10 ऑक्टोबर 1874 मध्ये बर्नमध्ये जागतिक पोस्टल संघटना (यूपीयू) स्थापन झाली. त्यानिमित्त भारतासह जगातील सर्व देशांमध्ये ‘पोस्टल डे’ साजरा केला जातो. या दिवशी पोस्टाच्या नवीन सेवा व प्रॉडक्टस् सादर केले जातात. टपाल कार्यालये, मेल सेंटर्समध्ये प्रदर्शने, परिषदा, चर्चासत्रे, कार्यशाळा, तसेच सांस्कृतिक, क्रीडा व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जातात.

टपाल आठवडा असा होणार साजरा
टपाल आठवड्यानिमित्त विविध दिन साजरे करण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये नऊ ऑक्टोबरला ‘वर्ल्ड पोस्ट डे’, दहाला ‘सेव्हिंग बँक डे’, 11 ला ‘मेल डे’, 12 ला ‘फिलॅटेली डे’, 14 ला ‘बिझनेस डेव्हलपमेंट डे’, 15 ऑक्टोबरला ‘पोस्टल लाइफ इन्शुरन्स डे’चा समावेश राहणार आहे.

सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न
टपाल आठवड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्यामध्ये विविध योजनांनुसार दिवस साजरे करण्यात येणार असून, कार्यक्रमात उपस्थितांशी हितगूज केले जाणार आहे. सर्वसामान्यांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येईल.’’ क्यू. ओ. बेग, प्रवर अधीक्षक, अकोला.