आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी घेतले निसर्ग शिक्षणाचे धडे; रोटरी क्लब व युथ होस्टेलचा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मेळघाटसारखा निसर्गसंपन्न प्रदेश, रात्रीची बोचरी थंडी, पहाटेचे धुके, मैलांचा पायी प्रवास, साहसी खेळ, सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल, पक्षी, वन्यजीवांचे दर्शन असा काहीसा सोहळा अकोल्यातील 60 विद्यार्थ्यांनी अनुभवला. निमित्त होते रोटरी क्लब ऑफ अकोलाच्या पाचही शाखा व युथ होस्टेल असोसिएशनतर्फे झालेल्या निसर्ग शिक्षण शिबिराचे.
रोटरीच्या ‘रोटरी युथ लिडरशिप अवॉर्ड’ या उपक्रमांतर्गत गुल्लरघाट येथे हे तीनदिवसीय शिबिराचे आयोजन झाले. युथ होस्टेल असोसिएशनच्या अशा निसर्ग शिक्षण शिबिराचे यंदा 14 वे वर्ष होते. शिबिरासाठी 29 नोव्हेंबरला सकाळी 9.30 वाजता सिव्हिल लाईन येथील आयएमए हॉल येथून विद्यार्थी रवाना झाले. शिबिरात 12 ते 18 वर्ष वयोगटातील 45 मुली व 15 मुले असे एकूण 60 विद्यार्थी सहभागी झाले. अकोला ते गुल्लरघाट असा प्रवास करत विद्यार्थी निसर्ग परिचय केंद्र परिसरातील छावण्यांवर पोहोचले. या ठिकाणी सर्वांचे स्वागत करून ओळख करून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना तीनही दिवसांचा कार्यक्रम व काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर गुल्लरघाट येथील तलावावर देवेंद्र तेलकर, राजू भागवत यांच्या मार्गदर्शनात पक्षी निरीक्षण झाले. यामध्ये पीनटेल, ब्राrाणी डक, कॉम्बडक, शेकाट्या, लेसर विसलिंग डक आदी पक्ष्यांचे विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले, तर सायंकाळी नेहरू तारापोरवाला यांनी साहसी खेळ व अती उंचीवरील पक्षी जीवन यावर स्लाइड शो दाखवून मार्गदर्शन केले. दुसर्‍या दिवशी विद्यार्थ्यांनी गुल्लरघाट ते किल्ले नरनाळा असा गिर्यारोहणाचा आनंद लुटला, तसेच रिव्हर क्रॉसिंगचा थरार अनुभवला. रात्री वन्यजीव व पक्षी जीवनावर आधारित स्लाइड शो झाला.
अखेरच्या तिसर्‍या दिवशी प्रमाणपत्र व पारितोषिक वितरणाने शिबिराची सांगता झाली. या वेळी रोटरीचे जुगलकिशोर चिराणिया, युथ होस्टेलचे नेहरू तारापोरवाला, उदय मालसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी युथ होस्टेलचे मंदा बासोले, ललित शिंदे, मनीष अग्रवाल, मोहन विठ्ठलानी, अँड. राधेश्याम मोदी, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर किशोर केडिया, रोटरी क्लब ऑफ अकोला मुख्यचे अध्यक्ष राजू बजाज, इस्टचे अध्यक्ष र्शीकांत सुरेका, मिडटाऊनचे अध्यक्ष वैभव शाह, नॉर्थचे अध्यक्ष विजय ठाकरे, सेंट्रलचे अध्यक्ष जितेंद्र लिखीते, रोटरीचे देवेश शाह, प्रशांत जैन, संजय धाबलिया, प्रशांत झांबड, मनीष लढ्ढा, संदीप जोशी, राजेश खंडेलवाल आदींनी पुढाकार घेतला.