आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nehru Inaugurated Khandelwal Tower, Divya Marathi

नेहरूंच्या हस्ते झाले होते अकोल्‍यातील खंडेलवाल टॉवरचे उद्घाटन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीमुळे देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या अकोला दौर्‍याच्या भेटी पुन्हा एकदा जागृत झाल्या आहेत. शहराच्या वैभवात भर घालणार्‍या सुंदराबाई खंडेलवाल टॉवरचे उद्घाटन 12 फेब्रुवारी 1962 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी त्यांनी नगरपालिकेच्या कामाची प्रशंसा केली होती.

या टॉवरच्या बांधकामासाठी येथील दानशूर (कै.) हिरालालजी खंडेलवाल यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या वेळी 20 हजार रुपयांची देणगी दिली होती. या टॉवरची उंची 87 फूट असून, त्यात पाच मजले आहेत. टॉवरवर पाच फूट व्यासाचे घड्याळ आहे. आज हे घड्याळ बंद आहे. टॉवरचे संपूर्ण बांधकाम दगडाचे आहे. हे बांधकाम स्थापत्य शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

टॉवरच्या उद्घाटनप्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरूंनी झालेल्या सभेत नगरपालिकेच्या कार्यासंबंधी गौरवोद्गार काढले होते. ते म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत नगरपालिकेनेही नगराची उन्नती केली आहे. नगरातील गलिच्छ वस्त्या नाहीशा केल्या असून, नगरातील पाणीपुरवठय़ाची मोठी योजनाही कार्यान्वित केली आहे. याशिवाय अनेक महत्त्वाची कामे नगरपालिकेने उत्तम रीतीने पार पाडली आहेत. त्याबद्दल मला अत्यंत आनंद वाटतो’.

कुठे नगरपालिका, कुठे महापालिका
शहराच्या विकासाचे श्रेय (कै.) विनयकुमार पाराशर यांना दिले जाते. त्यांच्या कार्यकाळात नगरपालिका राज्यात क्रमांक एक होती. वास्तविकत: नगरपालिका एक छोटी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. एका संस्थेने उभारलेल्या टॉवरच्या उद्घाटनाला पंतप्रधान येतात. पंतप्रधानांनी त्या वेळी नगरपालिकेचे आणि पाराशर यांचे कौतुक केले होते. पालिका असताना शहराला सुगीचे दिवस होते. आता मात्र विदारक चित्र पाहावयास मिळते, अशी खंत पाराशर यांचे सहकारी माजी महापौर सुरेश पाटील यांनी व्यक्त केली.