आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अबब...निगेटिव्ह रक्तगट दाखवला चक्क पॉझिटिव्ह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एकाच रुग्णाचे दोन वेगवेगळे रक्तगट दाखवून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार जिल्हा स्त्री रुग्णालयात मंगळवारी सकाळी उघडकीस आला. निगेटिव्ह रक्तगट असलेल्या महिलेचा पॉझिटिव्ह रक्तगट प्रयोगशाळा तंत्रज्ञाने दाखवला. ज्या रुग्णालयात गर्भवती महिलांवर उपचार केले जातात, अशा ठिकाणी असा प्रकार घडणे म्हणजे गंभीरतेचा कळसच गाठण्यासारखे आहे.
सार्वजनिक आरोग्य सेवेंतर्गत असलेल्या दुर्गा चौकस्थित जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये दोनवाडा येथील एक महिला रक्तगट हिमोग्लोबिन तपासण्यासाठी गेली. तपासणीसाठी पॅथॉलॉजी विभागामधील प्रयोगशाळा तंत्रज्ञ अगडते यांनी रक्त काढले. जेव्हा रक्तगट सांगितला तेव्हा रुग्ण महिलेच्या भुवयाच उंचावल्या. तिला आधीच माहिती होते की, आपला रक्तगट तर निगेटिव्ह आहे. मग, ए. पॉझिटिव्ह कसे झाले, असा प्रश्न तिला तिच्या पतीला पडला. तिच्या पतीने संबंधित कर्मचाऱ्याला विचारणा केली, तर तुम्हाला जास्त समजते काय, असे म्हणून जोडप्यासोबत वाद घातला. तेव्हा पतीने पुन्हा रक्तगट तपासा असे म्हटल्यावर पुन्हा रक्त काढण्यात आले. तेव्हा महिलेचा रक्तगट निगेटिव्ह असा बरोबर निघाला. उपस्थित कर्मचाऱ्याने निगेटिव्ह रिपोर्ट आला बरं, अशी खिल्ली उडवत जोडप्याच्या हाती रिपोर्ट सोपवला.
प्रशासनाचे नियंत्रण सुटले
प्रसूती गर्भवती स्त्रियांवर उपचार करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात असा प्रकार घडणे चिंताजनक आहे. वरिष्ठांचे कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण सुटल्याने असे प्रकार अनेकदा रुग्णालयात घडत आहेत. या प्रकाराची वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी गंभीर दखल घेणे गरजेचे झाले आहे.
संकल्पनेलाच तिलांजली
निरोगी महाराष्ट्रासाठी.. आमचा प्रयत्न या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकल्पनेलाच जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रयोग शाळा तंत्रज्ञाने तिलांजली दिली आहे. २४ तास दक्ष असण्याचा दिखावा करणाऱ्या आरोग्य विभागाचे यानिमित्ताने पितळ उघडे पडले, असेच म्हणावे लागेल.
रिपोर्ट देताना चुकीने लिहिल्या गेले
- तपासणी दरम्यान घडलेला हा प्रकार गंभीरच आहे. मात्र, कर्मचाऱ्याकडून माहिती घेतली असता त्याने तपासले निगेटिव्हच होते. पण, रिपोर्ट देताना पॉझिटिव्ह असे लिहिल्या गेले असल्याचे सांगितले.
डॉ. विनोद जाधव, पॅथॉलॉजिस्ट, जिल्हा स्त्री रुग्णालय.
बातम्या आणखी आहेत...