आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीटंचाईची ‘त्सुनामी’तीन व्हॉल्व्ह केले निकामी, पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह नादुरुस्त करण्याचे सत्र सलग दुस-या दिवशीही कायम राहिले. 10 फेब्रुवारीला दोन्ही मुख्य जलवाहिनींवरील तीन व्हॉल्व्ह समाजकंटकांनी निकामी केल्याची घटना समोर आली आहे. हे तिन्ही व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यास चार ते पाच दिवस लागणार आहेत. त्यामुळे शहरावर पाणीटंचाईची त्सुनामी आली आहे.
गत अनेक वर्षांपासून सुरू असलेली पाणीचोरी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी निकराचा संघर्ष करत नियंत्रणात आणली. आतापर्यंत तब्बल चार वेळा मुख्य जलवाहिनीवरील अवैध नळजोडण्यांवर कारवाई करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर थकबाकीची कोट्यवधी रुपयांची रक्कम बाजूला ठेवत केवळ दोन लाख रुपयांच्या बँक गॅरंटीवर ग्रामपंचायतीला पाणी देण्याची बाबही मान्य केली. परंतु, चोरीचेच पाणी घेण्याची सवय जडलेल्या बार्शिटाकळी येथील काही समाजकंटकांनी व्हॉल्व्ह नादुरुस्त करण्याचा नवा केविलवाणा फंडा शोधून काढला आहे. फेब्रुवारीला एका मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह लोखंडी घणाचे घाव करून नादुरुस्त करण्यात आला. १४ तासांनंतर फेब्रुवारीला हा व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर पुन्हा १० फेब्रुवारीला सकाळी वाजता दोन्ही मुख्य जलवाहिनीवरील तीन व्हॉल्व्ह लोखंडी घणाचे घाव घालून संपूर्णपणे नादुरुस्त करण्यात आले. हा प्रकार १० फेब्रुवारीच्या पहाटे करण्यात आला. ही बाब सकाळी वाजता निदर्शनास आली. दरम्यान, अकोला पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याबाबत मंत्रालयात बैठक असल्याने सर्व अधिकारी, पदाधिकारी मुंबईला गेले आहेत, तर नवनियुक्त आयुक्त सोमनाथ शेट्ये ११ फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार आहेत. तूर्तास महापालिकेत कोणताही वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामाला चार ते पाच दिवसांचाकालावधी लागणार असल्याने चार ते पाच दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प राहणार आहे. व्हॉल्व्ह नादुरुस्त केल्याची माहिती मिळाल्यानंतर मानसेवी अभियंते नरेश बावने, संदीप चिमणकर, नीरज ठाकूर, कैलास निमरोट, विष्णू डोंगरे, संजय थोरात, भरत शर्मा, कंत्राटदार शेख फिरोज तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
पाण्याचेदर वाढण्याची शक्यता
पाचदिवस शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने तसेच शहरातील मोजका भाग वगळल्यास जमिनीतील पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जमिनीतील पाणी पिणे शक्य नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेतल्याशिवाय पर्याय नसल्याने पाण्याच्या कॅनचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाप्रसादवाटप अडचणीत
११फेब्रुवारीला संत गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा होत आहे. ११ फेब्रुवारीपासून शहरात विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. महाप्रसादात शेकडो नागरिक सहभागी होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. अशा परिस्थितीत जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह नादुरुस्त केल्याने महाप्रसादाचे वाटपही अडचणीत येऊ शकते.
सव्वाकोटी लीटर पाण्याचा अपव्यय
आतापर्यंतव्हॉल्व्ह नादुरुस्त करण्याच्या दोन वेळा घटना घडल्या. पहिल्या घटनेत एक व्हॉल्व्ह, तर आता तीन व्हॉल्व्ह नादुरुस्त करण्यात आले. यामुळे महान जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. परंतु, यादरम्यान सव्वा कोटी लीटर पाण्याचा अपव्यय झाल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
पोलिसांचीबघ्याची भूमिका
अवैधनळजोडणी तोड मोहिमेतही पोलिस फारसे सक्रिय झाले नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही मोहीम दगडांचा मारा झेलत तसेच दादागिरी सहन करत पूर्ण करावी लागली. त्या वेळीही बार्शिटाकळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती आता व्हॉल्व्ह नादुरुस्तीच्या घटनेतही पोलिसांची भूमिका बघ्याचीच आहे.
सर्वात मोठे आव्हान
आयुक्त सोमनाथ शेट्ये सायंकाळी अकोल्यात दाखल झाले. ११ फेब्रुवारीला ते रुजू होत आहेत. रुजू झाल्याबरोबर त्यांना पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे रुजू होताक्षणी समस्येचे ताट आयुक्तांसमोर मांडलेलेच आहे.
मजीप्रासाठी धक्कादायक
नेमकी१० फेब्रुवारीला मंत्रालयात अकोला पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपवण्याबाबत बैठक सुरू आहे. हा प्रकार बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर योजना ताब्यात घेतल्यानंतर काय? असा प्रश्न मजीप्राच्या अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे ही योजना घ्यायची की नाही? असा प्रश्न मजीप्रासमोर निर्माण झाला आहे.