आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मल ग्राम अभियानासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचा ‘अँक्शन प्लॅन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेने निर्मल ग्राम अभियानाचा ‘अँक्शन प्लॅन’ तयार केला आहे. आता जिल्हय़ात या अभियानाचा व्यापकपणे प्रचार करण्यात येणार आहे. योजना अधिक गतिमान करण्यासाठी संबंधितांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. याचा आढावा विभागीय आयुक्त दर दोन महिन्यांनी घेणार आहेत.

जिल्हय़ात निर्मल ग्राम अभियानाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. यासंदर्भातील विभागीय आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. अमरावती विभागात केवळ अकराच गावे निर्मल ग्राम योजनेसासाठी पात्र ठरली होती. ही नामुष्की अमरावती विभागात का आली याची कारणे शोधण्याची वेळ विभागातील जिल्हा परिषद प्रशासनावर आली आहे. नुकताच विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी जिल्हय़ातील निर्मल ग्राम योजनेचा आढावा घेतला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार व निर्मल भारत योजना यासोबतच गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना ग्रामीण भागात शौचालय वाढवण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना केल्या आहेत. स्थानिक पातळीवर सरपंच व ग्रामसेवकांचे सहकार्य होत नसल्यामुळे शौचालयाची कामे रखडली आहेत. याबाबत संबंधित विभागाचे शाखा अभियंता तांत्रिक बाबी पूर्ण करीत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शौचालयांची कामे जिल्ह्यात रेंगाळली आहेत.

उदासीनता कारणीभूत
निर्मल ग्राम योजनेला जिल्ह्यात हरताळ फासल्या गेली आहे. या योजनेकडे प्रशासनासह नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लोकाभिमुख असलेली शासनाची योजना सपशेल अपयशी ठरली आहे. ही योजना चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. वाहनाचा तिढा सुटणार

निर्मल भारत अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात यावे, यासाठी या विभागाकडे वाहनाची व्यवस्था नाही. त्यामुळे या योजनेचा व्यापकपणे प्रचार होत नाही. परिणामी, याचा परिणाम योजनेवर होत आहे. याची दखल विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी घेतली आहे. विभागाला वाहन उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. वाहन मिळाल्यानंतर या अभियानाचे काम अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. त्यामुळे कामालाही वेग येणार आहे.

दृष्टिक्षेप पथकाच्या पडताळणीवर
जिल्ह्यास्तरीय समितीकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला एकूण 100 गुण दिले जाणार आहेत. या गुणांकनाच्या आधारे त्या गावांची पडताळणी करण्यात येणार आहे. यात निर्मल ग्राम पुरस्कारासाठी आवश्यक निकषांमध्ये 100 टक्के वैयक्तिक शौचालय बांधकाम यासाठी 40 गुण आहेत. सवात जास्त गुण शौचालय बांधकामासाठी देण्यात आले आहे. शालेय स्वच्छता 8 गुण, अंगणवाडी स्वच्छता 8 गुण, पाणी सुविधा 10 गुण, माहिती शिक्षण व संवाद 9 गुण, घनकचरा 5, सांडपाणी 10 गुण देण्यात येतात. या गुणांकनावरच ग्रामपंचायतींची निवड होत असते. त्यामुळे त्याला महत्त्व आहे. जिल्हा, राज्यस्तरीय समितीने पाहणी केल्यानंतर आता केंद्राच्या पथकाकडून पाहणी होणार आहे.

गावपातळीवर तयारीला झाली सुरुवात
समितीकडून ग्रामपंचायतीची पाहणी होणार आहे. त्याचे वेळापत्रक निश्चित झाले नसले तरी, गावपातळीवर त्याची तयारी होत आहे.

निर्देश देणार
निर्मल भारत योजना ही चांगल्या पद्धतीने जिल्हय़ात राबवल्या गेली पाहिजे यासाठी संबंधिताना निर्देश देण्यात आले आहे. संबंधित यंत्रणेचे अधिकारी योजनेला सहकार्य करणार नाहीत. त्यांचा कामकाजाचा अहवाल जिल्हा परिषदेकडून घेण्यात येणार आहे.’’ अरुण शिंदे, जिल्हाधिकारी अकोला.

लोकसहभाग महत्त्वाचा
निर्मल भारत अभियान यशस्वीपणे करण्यासाठी लोकसहभाग अतिशय महत्वाचा आहे. त्यादृष्टीने लोकप्रतिनिधीसह नागरिकांनी सहकार्याची अपेक्षा आहे. अभियान राबविण्यासाठी वाहन नसल्यामुळे तीन दिवसात वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’’ अरूण उन्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी.

अशी झाली पडताळणी
राज्यस्तरीय व आंतर जिल्हा पथकाने जिल्ह्यातील निर्मल ग्राम पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या गावांत शौचालय, शाळा, अंगणवाडी स्वच्छता, शौचालयांचा वापर, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेच्या संदेशाची पाहणी करून पडताळणी केली आहे. या पाहणीतून अनेक बाबी कळाल्या आहेत. त्याचा फायदा अभियान यशस्वी करण्यासाठी होईल.

पथकाची पाहणी
जिल्हय़ातील निर्मल ग्राम योजनेसाठी 16 गावे प्रस्तावित केली होती. यांपैकी अंबाशी व मांडोली गावांची पाहणी उस्मानाबाद येथील आंतर जिल्हा पथकाने केली आहे. प्रस्तावित 16 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामधूनच दोन गावांची पाहणी आंतर जिल्हा पथकाने केली आहे. याचा अहवाल पथक हे राज्य शासनाला सादर करणार आहे.