आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Banugade Patil,Latest News In Divya Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य कौतुकाच्या थापेवरच- प्रा.नितीन बानुगडे पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘एका कौतुकाच्या थापेने माँसाहेब जिजाऊ यांनी तानाजी मालुसरेंसारखे लढवय्ये नवरत्न घडवले. ज्या समाजात कौतुकाची थाप देणारी माणसे असतात तेथे नवरत्न घडत असतात. या कौतुकाच्या थापेवरच उद्याचे तानाजी, मालूजी उभे राहतील. जेथे रयतेचे राज्य असते तेथे लोक मरायला अन् मारायला मागेपुढे पाहत नाहीत. शिवरायांचे स्वराज्य हे कौतुकाच्या थापेवरच उभे राहिले होते’, असे प्रतिपादन शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी येथे व्यक्त केले.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे येथील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित ‘छत्रपतींचा इतिहास’ या विषयावरील जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम तायडे अध्यक्षस्थानी होते. माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास त्यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून शिवचरित्रातील इतिहास दाखले देत प्रभावीपणे मांडला. त्याला आजच्या युगाची जोड देत त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली. त्यांचे व्याख्यान तरुणांमध्ये प्रेरणा अन् नवचैतन्याची स्फूर्तीदायी ठरले. या कार्यक्रमास तरुणांची मोठी उपस्थिती होती.
प्रा. बानुगडे पाटील म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या काळात विजय मिळवला, तर गडावर पांढरा धूर पेटवून आनंदाचा संदेश दिला जायचा. वाईट संदेश असला, तर काळा धूर केला जायचा. हा धूर या गडांवरून त्या गडांवर अशा प्रकारे महाराष्ट्रात 360 गडांवर हा संदेश या पद्धतीने क्षणात पोहोचला जायचा. हे तंत्र आजच्या मोबाइलपेक्षाही प्रगत होते. यात नॉट रिचेबल किंवा रेंजचा अडसर नव्हता. शिवरायांच्या इतिहासात जबाबदारी व सकारात्मता हे घटक महत्त्वाचे होते. प्रत्येकजण आपापली जबाबदारी सकारात्मक पद्धतीने पार पाडत असे. सावधगिरीने पावले उचलली जात असत. त्यामुळे नुसते शिवाजी महाराज की जय असे न म्हणता त्यांचे विचार आचरणात आणा, तर स्वराज्याचे सुराज्य निर्माण होईल. आपण आपली साधी मतदानाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत नाही. ज्या दिवशी देशात 100 टक्के मतदान होईल. त्या दिवशी एकही चुकीचा माणूस निवडला जाणार नाही. आज मातीला मारणारी आणि आपण सिंह आहोत, या भ्रमात वावरणारी पिढी निर्माण झाली आहे. त्यांनी वास्तवतेचे भान ठेवावे. प्रत्येक नागरिक सजग झाला, तर देशाला दहशतवादी हल्ल्याचा धोका जाणवणार नाही, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हाधिकारी अरुण शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श, महापालिकेचे आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिल्हाध्यक्ष पंकज जायले, स्वागताध्यक्ष एकनाथ दुधे आदी उपस्थित होते. कपिल ढोके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.