आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलढाण्यात कामगार कार्यालयाला जिल्ह्यात नाहीत कर्मचारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील सरकारी कामगार अधिकाऱ्यांसह अन्य १२ पदे रिक्त असल्याने कार्यालयातील कामे खोळंबली आहेत. त्याशिवाय अन्य कल्याणकारी मंडळाची पदेही रिक्त असल्याने जिल्ह्यातील घरेलू कामगारांच्या नोंदणीवर परिणाम होत आहे. त्यातच येथील जिल्हा कामगार अधिकारी हे महत्त्वाचे पदही रिक्त आहे.
तालुका ठिकाणीही हीच स्थिती आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी जिल्ह्याला मिळालेल्या पालकमंत्र्यांकडेच कामगार खाते होते. तरीही जिल्ह्यातील बरीच पदे भरण्यात आली नाही, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे नवीन सरकारकडून ही पदे भरण्याची अपेक्षा केली जात आहे.

कामगार अधिकारी कार्यालयांतर्गत बुलडाणा, मेहकर, शेगाव, खामगाव मलकापूर या चार तालुक्यांच्या ठिकाणी कार्यालये आहेत. या सर्वच कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. परिणामी, नोंदणीकृत दुकाने संस्थांकडील वसुलीवर परिणाम होत आहे. तालुका निरीक्षक पदांमुळे नवीन दुकाने नोंदणीचे प्रमाणही घटले आहे. असंघटित घरेलू कामगारांच्या नोंदणीचे काम होत नाही. त्यामुळे या कामगारांना शासनाच्या कल्याणकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
कामगारांच्या नोंदणीचे नूतनीकरणही होत नाही. नोंदणीसाठी येणाऱ्या कामगारांना कर्मचारी नसल्याने परत जावे लागत आहे. कामगार कल्याण महामंडळामार्फंत कोणत्या योजनेंतर्गत कोणता लाभ मिळणार आहे, याची माहिती मिळत नाही. जिल्हा कार्यालयातच कर्मचारी नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. घरेलू कामगार इमारत बांधकाम कामगारांना एकूण २० लाभ मिळतात. परंतु, याचा लाभ दोन तीन लाभार्थी वगळता कोणालाही मिळाला नाही. यामुळे कामगारांना योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे शासनाने रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
दहा महिन्यांत फक्त ४६० नोंदणी
जिल्ह्याचीलोकसंख्या लक्षात घेता लोकसंख्येच्या किमान १० टक्के तरी कामगारांची नोंदणी होणे आवश्यक आहे. फेब्रुवारी महिन्यात ही नोंदणी ३,१४० अशी हाेती. आता ही नोंदणी ३,६०० इतकी आहे. नोंदणीसाठी ६० रुपये शुल्क आकारले जाते.
जिल्ह्यात नोंदणीकृत दुकानांची संख्या तीन हजार ३६ आहे. व्यापारी संस्था- २,५०६, निवासी योग्य पथिकाश्रम - ८४ , उपहारगृह - ७२५, नोकर नसलेल्या आस्थापना - १४,७६९, नाट्यगृह - २१, दुकांनाना वार्षिक कर ३६० इतका असतो. तीन वर्षांचा कर १,०८० इतका आकारला जातो. कर्मचारीच नसल्याने हा कर जमा करणे शक्य होत नाही.