आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत काम केलेल्या शिक्षकांना मानधन नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- फेब्रुवारी 2011 मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीचे काम करणार्‍या शिक्षकांना अद्यापही निवडणूक काळातील मानधन महापालिकेने अदा केले नाही, यापूर्वी निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेची निवडणूक होऊन दीड वर्षे उलटले. या निवडणूक काळात विविध कामांसाठी 2100 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कार्य केले होते. मात्र, या कामाचा कोणताही मोबदला शिक्षकांना मिळाला नाही. निवडणूक काळातील मानधन तत्काळ मिळणे आवश्यक असताना अद्यापही ते मिळाले नाही.


एका शिक्षकाचे सुमारे 1,500 रुपये याप्रमाणे मानधन महापालिका प्रशासनाने दिले नाही. यासंदर्भात माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विलास हरणे, जिल्हा कार्यवाह जयदीप सोनखासकर यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले, मात्र त्यानंतरही मानधनाची रक्कम देण्यात आली नसल्याने शिक्षकांमध्ये सध्या नाराजी आहे. तरी मनपाने लवकर निवडणुकीतील मानधन द्यावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

निवडणूक कार्याचे पैसे तत्काळ देणे गरजेचे
राष्ट्रीय कार्य म्हणून निवडणूक कर्तव्याकडे पाहिले जाते. निवडणुकीचे काम झाल्यानंतर लगेच त्यासंबंधीची रक्कम संबंधित कर्मचार्‍यांना तत्काळ देण्यात येत असते. महापालिकेने निवडणूक कार्य करणार्‍या शिक्षकांना रक्कम दिली नसल्यामुळे या रकमेचे काय झाले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

तर आंदोलन करू
आम्ही अनेक निवडणुकांमध्ये कार्य करतो. त्याचे मानधन तत्काळ देण्यात येते. मात्र, 2011 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीचे मानधन आम्हाला अद्यापही देण्यात आले नाही. त्यामुळे 2100 शिक्षकांची रक्कम कुठे गेली, हा प्रश्‍न आहे. महापालिकेने ही रक्कम दिली नाही, तर आंदोलन करावे लागेल.त्यामुळे महापालिकेने तात्काळ ही रक्कम शिक्षकांना देण्यात यावी.’’ विलास हरणे, जिल्हाध्यक्ष, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ.