आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खबरदार! सेतूत ‘शाळा’ नको!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील सेतू केंद्र संचालकांकडून सर्वसामान्य नागरिकांची विविध प्रमाणपत्रांसाठी होत असलेल्या लुटीबाबत ‘अधिकार्‍यांचा हेतू अन् लुटीचा सेतू’ या आशयाचे वृत्त 25 जून रोजी प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत सेतू केंद्राच्या ठिकाणी दर्शनीभागावर विविध प्रमाणपत्रांचे निश्चित दरपत्रक लावण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिल्या.

नागरिकांना जलद व मुबलक दरात विविध प्रकारच्या सेवा पुरवण्याच्या दृष्टीने शासनाने सेतू हा उपक्रम सुरू केला. मात्र, शहरातील सेतू केंद्राकडून या संकल्पनेला तिलांजली दिली जात असून, नागरिकांकडून प्रमाणपत्रासाठी आर्थिक लूट केली जात असल्याचे वास्तव शहरात पाहावयास मिळाले. नागरिकांची सेतू केंद्र संचालकांकडून लूट होत असल्याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित करून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सेतू केंद्र संचालकांची बैठक बोलावली. यामध्ये त्यांनी नागरिकांची अडवणूक व आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित सेतू केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी ताकीद दिली. तर, प्रत्येक सेतू केंद्र संचालकाने विविध प्रमाणपत्रांसाठी शासकीय नियमानुसार लागणारा निश्चित दर फलकावर जाहीर करण्याच्या सूचना दिल्या. याची दखल घेत शहरातील बहुतांश सेतू केंद्रांमध्ये निश्चित दर असलेला फलक लावला आहे.
सेतू सर्वसामान्यांसाठी आहे : ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने 27 जून रोजी अकोला तालुक्यातील सेतू केंद्र संचालकांची बैठक बोलावली. या बैठकीत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व तहसीलदार संतोष शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सर्वसामान्यांच्या हितासाठी सेतू कार्यान्वित करण्यात आले आहेत. या माध्यमातून शाळा करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, असा इशारा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिला.
अडचण असल्यास समोर या : तालुक्यातील कोणत्याही सेतू केंद्र संचालकाला कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास त्यांना आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे अडचण असल्यास समोर या, असा सल्ला तहसीलदार संतोष शिंदे यांनी
दिला आहे.