आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवस अकोला शहराचा पाणीपुरवठा ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील शॉर्ट सर्किटमुळे दोन पंप नादुरुस्त झाल्याने तसेच पॅनेल जळाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे आता शहराला दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. दोन दिवस शहरात पाणीपुरवठाच होणार नसल्याने नागरिकांना गोड्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. मंगळवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील काळे यांनी दिली.

महान येथील जलशुद्धीकरण केंद्रात एकूण पाच पंप आहेत. यापैकी दोन पंप पूर्वीपासूनच बंद आहेत. नियमितपणे पाच पंप एकाच वेळी चालवल्या जात नाहीत. दोन पंपांवरच पाणीपुरवठा केला जातो. परंतु, एखादा पंप नादुरुस्त झाल्यास पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी तीन पंप स्टँड बाय ठेवले जातात. परंतु, उपलब्ध पंपांचे आयुष्यमानही संपलेले आहे. त्यामुळे पंप वारंवार नादुरुस्त होत आहेत. यापूर्वीही पंप जळण्याचा प्रकार घडल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला होता.
मनपाने या बाबी लक्षात घेऊनच पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. परंतु, वरिष्ठ पातळीवर या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. परंतु, महापालिकेने २७ कोटी रुपयांतून पाणीपुरवठा योजनेसाठी १२ कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत, तर एक पंप खरेदी करण्याचा प्रस्तावही मंजूर केला आहे. अद्याप पंप खरेदीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आयुष्य संपलेल्या पंपांच्या माध्यमातूनच शहराला पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. सुरू असलेल्या तीन पंपांपैकी एक पंप दसऱ्याच्या दिवशी नादुरुस्त झाला. या पंपाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसतानाच ऑक्टोबरला शॉर्ट सर्किटमुळे पॅनेल जळाल्याने तसेच एक पंप नादुरुस्त झाला. त्यामुळे एका पंपावरच भिस्त आली आहे. परंतु, पंप दुरुस्ती तसेच पॅनेल दुरुस्तीचे काम करताना हा पंपही बंद राहील. त्यामुळे पाणीपुरवठा ठप्प राहील.

नागरिकांनी सहकार्य करावे
जलशुद्धीकरण केंद्रातील पॅनेल जळाल्याने तसेच पंपात बिघाड झाल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे. प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. दुरुस्तीसाठी दोन दिवस लागतील. नागरिकांनी तांत्रिक अडचण लक्षात घेऊन महापालिकेला सहकार्य करावे.'' - सुनीलकाळे, कार्यकारीअभियंता, पाणीपुरवठा विभाग, अकोला.