आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरच्या जागेतील व्यवसायाला आता घरगुती दराने वीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - घरच्याच जागेत किरकोळ व्यवसाय करणार्‍या आणि 300 युनिटपेक्षा कमी वीज वापर करणार्‍या वीज ग्राहकांना यापुढे घरगुती वीजदर लागू करण्याचे आदेश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरण कंपनीला दिले.

वीजग्राहक संघटनेच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान, दिलेल्या या आदेशामुळे राज्यातील सुमारे 3.5 लाख घरगुती व्यावसायिकांना दिलासा मिळाला आह़े घरातच चहा स्टॉल, किराणा दुकान, झेरॉक्स, स्टेशनरी आदी व्यवसाय करणार्‍यांना व्यावसायिक ग्राहक म्हणून त्यांच्या घरी व्यावसायिक मीटर लावून व्यावसायिक दराने वीज बिल आकारण्याचा प्रकार महावितरणकडून संपूर्ण राज्यात सुरू होता. त्यामुळे घरगुती लघुउद्योजकांना आर्थिक फटका बसत होता. विद्युत नियामक आयोगाने ऑगस्ट 2012 मध्ये दरनिश्चिती आदेश दिला होता. त्यानुसार चरितार्थ व उपजीविकेसाठी घरात छोटे व्यवसाय करणार्‍यांना घरगुती वीज दर लागू केली होती़ मात्र, महावितरणाच्या जाचक अटींमुळे या सवलतीचा लाभ गेल्या एका वर्षापासून लघु व्यावसायिकांना मिळत नव्हता़ त्यासाठी महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेच्या वतीने हा प्रश्न लावून धरण्यात आला होता़ आता त्याला यश आले असून, यापुढे लघु व्यावसायिकांना घरगुती दराने वीज बिल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्या ग्राहकांकडून 1 ऑगस्ट 2012 पासून व्यावसायिक दराने वीज आकार घेतला गेला असेल व ज्यांच्या घरात व्यावसायिक वीज मीटर लावले असतील तर ते काढण्याचे आदेशही आयोगाने दिल़े हा आदेश जारी झाला असला तरी, स्वतंत्र व्यावसायिक व उद्योजकांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आह़े


महावितरणला मोठा आर्थिक फटका
घरातच लघुउद्योग करण्यार्‍यांची संख्या मोठी आहे. यांच्याकडून अद्यापपर्यंत व्यावसायिक दराने वीज बिल घेण्यात येत होते. आता घरात व्यवसाय करणार्‍या व 300 युनिटपेक्षा कमी वीज जाळणार्‍या ग्राहकांना घरगुती वीज दर लावण्यात येणार असल्याने महावितरणला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.


हा तर ग्राहकांच्या हिताचाच निर्णय
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. हा निर्णय ग्राहकांच्या हिताचा आहे.’’ एस. एस. धांडे, मुख्य अभियंता, अमरावती परिमंडळ, महावितरण, अकोला.