अकोला- गणेशउत्सवादरम्यान शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, बुधवारी अमरावती परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी संवेदनशील भागासह गणेश विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
गेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे गणेश विसर्जनादरम्यान दंगलसदृश स्थिती निर्माण झाली होती. तसा प्रकार शहरात कुठेही होऊ नये, म्हणून बुधवारी आयजींनी शहराची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अरुण शिंदे, पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, महापालिका आयुक्त महेंद्र कल्याणकर, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय खडसे, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आदी उपस्थित होते. या वेळी गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग, जयहिंद चौक, सुभाष चौक, ताजनापेठ, दगडी पूल, गणेश घाटाची त्यांनी पाहणी केली. या वेळी आवश्यक असलेल्या चौकांमध्ये सुरक्षा कठड्यांची व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. वीज खंडित झाल्यास तत्काळ पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश बिपीन बिहारी यांनी दिले आहेत. पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी संवेदनशील भागाची पाहणी केली.