आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाक्यासाठी आधी उतावीळ, आता नाखूश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - आधी जकात नाक्यावर वर्णी लावण्यासाठी फिल्डिंग लावणार्‍या कर्मचार्‍यांना आता हेच नाके नकोसे झाले आहेत. एलबीटीमुळे या नाक्यावर केवळ निपरिवहन शुल्क वसुली म्हणजे लष्कराच्या भाकर्‍या भाजण्याचा प्रकार आहे. त्यामुळे नाक्यावर जाण्याचा आदेश झुगारून नोटीस ओढवण्यापर्यंत या कर्मचार्‍यांची मजल गेली आहे.

जकात वसुली बंद झाल्यानंतर जकात विभागातून निपरिवहन शुल्क वसुलीचे काम होणार आहे. यासाठी 62 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. पैकी केवळ 30 कर्मचारी नाक्यावर रुजू झाले आहेत. इतर 32 कर्मचार्‍यांनी दांडी मारली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने दांडी मारणार्‍या 32 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून निलंबनाची प्रक्रिया सुरू केली आहे.

जकात बंद झाल्याने आता नाक्यांकडे कर्मचार्‍यांनी पाठ फिरवली आहे. महापालिका प्रशासनाने निपरिवहन शुल्क वसुलीसाठी 62 कर्मचार्‍यांची 11 नाक्यांवर नियुक्ती केली होती. पण, या विभागात रुजू होण्यास महापालिका कर्मचारी इच्छुक नाहीत. नियुक्तीकडे पाठ फिरवणार्‍या 32 कर्मचार्‍यांना अखेर निलंबनाची नोटीस प्रशासनाने बजावली आहे. मंगळवारी कर्मचारी रुजू झाले नाहीत, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मिळाली.

कारवाई करणार
महापालिका प्रशासनाने 32 कर्मचार्‍यांना निलंबित का करू नये, अशी नोटीस बजावली आहे. काही विभागप्रमुख कर्मचार्‍यांना सोडण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे जे कर्मचारी रुजू झाले त्यांच्यावर कामाचा ताण वाढता आहे. मंगळवारी हे कर्मचारी कामावर रुजू झाले नाही, महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.’’ कैलास पुंडे, सहायक आयुक्त, मनपा, अकोला.