आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांकडून आयुक्तांना बैठकीस हजर राहण्याचे पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रशासनासंबंधी कोणतीही महत्त्वाची बैठक घेण्याची सूचना सर्वसामान्यपणे आयुक्त त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांना देतात. मात्र, अशी सूचना दिल्यानंतर या बैठकीचे निमंत्रण आयुक्तांना दिले जात नाही. परंतु, आयुक्तांच्याच कक्षात होणाऱ्या एका बैठकीला उपस्थित राहण्याचे पत्र महापालिकेतील प्रशासन अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिले. विशेष म्हणजे या पत्राखाली त्यांनी स्वाक्षरीही केली आणि त्याचीच प्रतिलिपीही आयुक्तांना दिली. या प्रकारासाठी निमित्त घडले ते शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाच्या बैठकीचे.

राज्य शासनाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाच्या सूचना सर्व महापालिका, नगरपालिकांना देण्यात आल्यात. जुलैला हा सर्व्हे केला जाणार आहे. या अनुषंगाने २९ जूनला आयुक्तांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिक्षण विभागासह विविध विभागातील अधिकाऱ्यांना बैठकीचे लेखी निमंत्रण देण्यात आले. हा विषय शिक्षण विभागाशी संबंधित असल्याने शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी आली. प्रशासन अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखरीत्या पार पाडली. त्यांनी ज्या अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे होते, त्या अधिकाऱ्यांना तसे पत्र दिले. मात्र, हे पत्र आयुक्तांना देण्याची गरज नव्हती. परंतु, प्रशासन अधिकाऱ्यांनी आयुक्तांनाही निमंत्रण पत्र दिले. इतरांना दिलेल्या पत्रातील कोणताही मायना त्यांनी बदलला नाही. पत्राच्या वरच्या भागात प्रती, आयुक्त सोमनाथ शेटे असा उल्लेख करून खाली २९ जूनला सकाळी १० वाजता आयुक्तांच्या दालनात उपस्थित राहावे, अशी सूचनाही केली. खाली स्वाक्षरीसुद्धा केली. या पत्राची मजेशीर चर्चा सुरू होती. यावरून महापालिकेत कशारीतीने, कोणत्या पद्धतीने, कामकाज सुरू आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. सोमनाथ शेटे

प्रतिलिपीही आयुक्तांनाच
बैठकीलाउपस्थित राहण्याच्या पत्रावर प्रशासन अधिकाऱ्यांनी केवळ स्वाक्षरीच केली नाही, तर आयुक्तांना बैठकीला उपस्थित राहण्याचे पत्र दिल्याची माहिती आयुक्तांना ज्ञात असावी, यासाठी या पत्राची प्रतिलिपीही आयुक्तांना दिली. त्यामुळे आयुक्तांना एकाच बैठकीचे दोन पत्र मिळाले.
बातम्या आणखी आहेत...