आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On Sunday Ninth Recruitment Examination Take In The State

राज्यात रविवारी तब्बल नऊ भरती स्पर्धा परीक्षा होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - 27 ऑक्टोबरला एकाच दिवशी नऊ स्पर्धा परीक्षा विविध शहरांमधील केंद्रांवर होत आहेत. एकापेक्षा अनेक परीक्षांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले होते. आता या परीक्षा एकाच दिवशी आल्याने हजारो उमेदवार या परीक्षांपासून वंचित राहणार आहेत.

रविवारी घेण्यात येत असलेल्या काही पदांसाठीच्या जाहिरातीमध्ये परीक्षा कोणत्या दिवशी घेण्यात येतील, त्यासंदर्भात तारखांची घोषणा करण्यात आली नव्हती, तर काही परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर झाल्या होत्या. जे उमेदवार परीक्षांसाठी पात्र ठरले, अशांना रविवारी परीक्षा असल्याने परीक्षा केंद्राचे एसएमएस येणे सुरू झाले आहे. यामध्ये अनेक परीक्षा एकाच दिवशी आल्याने या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली असून, आता यापैकी एकच परीक्षा देता येणार म्हणून या विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली आहे. यातही रेल्वेच्या परीक्षांनी कहरच केला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही विभागांच्या परीक्षा एकाच दिवशी आहेत, तर अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी वरिष्ठ लिपिक व रक्तपेढी तंत्रज्ञ पदासाठीच्या परीक्षेचे केंद्र बुलडाणा आणि अमरावती ठेवण्यात आल्याने या जिल्हय़ातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या गैरसोयीचे झाले आहे. अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत, तर काही गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे. या सात परीक्षांसाठी ज्यांनी अर्ज केले आहेत. अशा उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षेच्या शुल्कापोटी तब्बल 3000 रुपये भुर्दंड बसला आहे. एवढेच नव्हे तर या परीक्षांसाठी अनेक पुस्तके खरेदी करावी लागली. एकापेक्षा अनेक परीक्षांचे प्रवेशपत्र आल्यामुळे आता कोणती परीक्षा द्यावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला असून, या परीक्षांमध्ये बदल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.


या स्पर्धा परीक्षा आहेत रविवारी
*अभियोग संचालनालय, मुंबई
*कारागृह निरीक्षक, पुणे
*अकोला आरोग्य विभाग- वरिष्ठ लिपिक आणि रक्तपेढी तंत्रज्ञ
*आयबीपीएस परीक्षा
*कारागृह वरिष्ठ लिपिक
*स्टाफ सिलेक्शन परीक्षा
*राज्यसेवा मुख्य परीक्षा
*मध्य रेल्वेची परीक्षा
* पश्चिम रेल्वे परीक्षा


कोणती परीक्षा द्यावी
मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. रेल्वे, अभियोग संचालनालय, आणि तुरुंग निरीक्षक आणि स्टाफ सिलेक्शन या पाच परीक्षांचे अर्ज भरले होते. द्विधा मन:स्थिती झाली आहे. - राहुल लोखंडे


इतर परीक्षांपासून मुकावे लागणार
मी अकोला जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ लिपिक, तुरुंग निरीक्षक, अभियोग संचालनालय आणि स्टाफ सिलेक्शन या परीक्षांचे अर्ज भरले होते. सर्व परीक्षाचे प्रवेश पत्र आले आहे. आता इतर परीक्षांपासून मुकावे लागणार आहे. - कपिल नायसे


एमकेसीएलद्वारे आम्ही वेगवेगळय़ा परीक्षांचे अर्ज भरले. काही परीक्षांमध्ये परीक्षा दिनांक देण्यात आला नव्हता. त्यामुळे या परीक्षा एकाच दिवशी येतील असा विचार केला नाही. पण, एकाच दिवशी या परीक्षा आल्याने इतर परीक्षा देता येत नाही. त्यासाठी परीक्षांच्या तारखांत बदल करावा. - धनंजय ठाकूर