आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महान धरणात केवळ आठ टक्के जलसाठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महान- अकोला शहरासह अन्य ५४ खेडी गावांची तहान भागवणाऱ्या महान धरणाच्या जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असून, या धरणात सद्य:स्थितीत ८.२५ टक्के एवढा जलसाठा शिल्लक राहिला आहे.
मृग नक्षत्र लागून तब्बल १३ दिवस उलटले आहेत. मात्र, अद्याप दमदार पाऊस झाला नाही. त्या पार्श्वभूमीवर महान धरणातील पाण्याची माहिती घेतली असता ७.१२६ दलघमी उपयुक्त जलसाठा असून, त्याची टक्केवारी ८.२५ एवढी आहे, तर गेल्या वर्षी याच तारखेला या धरणात २२.७६६ दलघमी अर्थात २६.३६ टक्के उपयुक्त जलसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १८ टक्क्यांनी पाणीपातळीत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने महान धरणाची पाणीपातळी १०० टक्क्यांवर पोहोचली नव्हती. त्यामुळे सद्य:स्थितीत या धरणात केवळ आठ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.
पाणीपातळीत घट झाल्याने धरणातील कधीही दिसणाऱ्या टेकड्या उघड्या पडल्याचे दिसत आहे. तसेच धरणाच्या काठावर वसलेल्या तीर्थक्षेत्र महादेव संस्थानातील गंगा माता मंदिराखाली नेहमी दिसणारे पाणीसुद्धा आटले आहे. त्यामुळे यंदाही पावसाने दडी मारल्यास नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ शकते. तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे वरुणराजाने यंदा कृपादृष्टी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी सोळंके यांच्या मार्गदर्शनात शाखा अभियंता ए.ए. सैय्यद, एस.व्ही. जानोरकार, पिंपळकर, पाठक हे नियोजन करत आहेत.
मालेगाव, जऊळका भागात दमदार पावसाची गरज : महानधरणाचा जलसाठा वाढण्यासाठी मालेगाव, जऊळका, काटा कोंडाळा या भागात दमदार पावसाची गरज आहे. या भागातील मुख्य नदी महान धरणात येऊन मिसळते. मात्र जऊळका ते महान धरणादरम्यान चार ते पाच लहानमोठे बंधारे आहेत. ते भरल्याशिवाय पाणी महान धरणात येणार नाहीे. त्यामुळे महान धरणाचा जलसाठा वाढण्याकरिता मालेगाव, जऊळका या भागात दमदार पावसाची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...