आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कैद्यांसाठी खुल्या तुरुंगास मंजुरी, ५० कैद्यांची क्षमता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विदर्भातील महिला कैद्यांसाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने अकोला येथे खुल्या कारागृहास मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने त्याच्या बॅरेक बांधकामासाठी २३ लाख ७४ हजार २०० रुपयांच्या अंदाजपत्रकास गुरुवार, १८ जूनला गृह विभागाचे कार्यासन अधिकारी रा. ई. गिरी यांनी मान्यता दिली. ५० सिद्धदोष कैद्यांसाठी हे कारागृह असून, अशा प्रकारचे राज्यातील हे दुसरे कारागृह ठरणार आहे.
यापूर्वी राज्य तुरुंग विभागाने वर्ष २०१० मध्ये पुण्यातील येरवडा कारागृहात महिला कैद्यांसाठी खुले कारागृह सुरू केले. महिलांसाठी वेगळ्या खुल्या कारागृहाचा हा पहिलाच प्रकल्प होता. दरम्यान, अकोला सिद्धदोष महिला कैद्यांसाठी कारागृह असावे, असा विचार समोर आला. त्याला मंजुरी मिळाली अाहे.
राज्यात चार खुले तुरुंग : गंभीर गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या महिलांना आयुष्यभर कोठडीत राहावे लागते. मात्र, शिक्षा भोगत असताना वर्तणूक चांगली असलेल्यांना पुन्हा संधी मिळावी, या हेतूने खुल्या कारागृहाचा विचार समोर आला. यापूर्वी राज्यात औरंगाबाद, मोर्शी आणि पैठण येथे पुरुषांसाठी, तर येरवडा येथे महिलांसाठी खुले कारागृह आहे.

गरज आहेच
- अकोला येथे महिला कैद्यांसाठी नवीन खुले कारागृह स्थापित करणे आवश्यक आहेच. त्याच दृष्टीने शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर विदर्भातील हे एकमेव कारागृह असेल.''
ज्ञानेश्वर जाधव, कारागृह अधीक्षक, अकोला
कैदी महिला करणार उद्योग
महिला कैद्यांची तुरुंगातील वर्तणूक आणि आरोग्य विचारात घेऊन त्यांना अकोला येथील खुले कारागृह दिले जाणार आहे. या ठिकाणी या महिला उदबत्त्या, मेणबत्त्या, तिखट तयार करणे, कपडे शिवणे अशी कामे करतील. शिवाय, काहींना शेती कामेही दिली जातील. दरम्यान, ज्या कैदी नियमाचे उल्लंघन करतील त्यांना पुन्हा खुले कारागृह दिले जाणार नाही.

एक महिन्याचा पॅरोल मिळू शकेल
यापूर्वी अकोला-वाशीम जिल्ह्यातील सिद्धदोष महिला कैद्यांना येरवडा येथील खुल्या कारागृहात पाठवावे लागत होते. मात्र, बऱ्याच महिला कैदी याला हरकत घेत. त्यांच्या नातेवाइकांनाही त्यांना भेटायला जाणे दूर पडत होते. शिवाय महिला कैद्यांचा शिक्षेचा कालावधी कितीही असला तरी त्यांना केवळ सात दिवसांचाच पॅरोल मिळतो. परंतु, खुल्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या महिलांना एक महिन्याचा पॅरोल मिळू शकेल.५ ते १५ वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या महिलांना २०, तर इतर महिला कैद्यांना २५ दिवसांचा पॅरोल मिळेल.
बातम्या आणखी आहेत...