आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समिती - सभापतींची आज निवडणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सभापती, उपसभापतींच्या निवडणुकीसंदर्भातील संभ्रमावस्था पूर्वीच निकाली निघाली असून, ५ सप्टेंबरला पंचायत समिती सभापती व उपसभातीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुषंगाने १४ सप्टेंबरला जिल्ह्यातील १३ ही पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक होत आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यामध्ये आपल्याला आडकाठी ठरणार नाही, अशा हिशोबानेच जिल्ह्यातील राजकारणी सभापती, उपसभापतीपदी त्यांच्या मर्जीतील तथा सामाजिक समीकरणे सांभाळल्या जातील, अशा पद्धतीनेच सभापती, उपसभापतींची निवड करण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने राजकारण्यांनी तगडी फिल्डिंगही लावलेली आहे. १३ ही पंचायत समितींमधील पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप-सेनेच्या ताब्यात काही पंचायत समिती गेल्या आहेत. १४ सप्टेंबरच्या निवडणुकीची केवळ औपचारिकताच पूर्ण करण्याचे बाकी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

बुलडाण्यामध्ये आघाडीला संधी : जिल्हा मुख्यालयीच्या बुलडाणा पंचायत समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून, येथील सभापतीपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अनिता तायडे यांची पुन्हा सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेस चार, राष्ट्रवादी तीन, सेना चार व भाजप एक, असे पक्षीय बलाबल आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा पंचायत समितीच्या सभापती निवडीकडे राजकीय व्यक्तींचे लक्ष आहे.

जळगाव जामोदमध्ये सविता राऊत यांची वर्णी
युतीच्या ताब्यात असलेल्या जळगाव जामोद पंचायत समिती सभापतीपदावर सविता राऊत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ओबीसी महिला या प्रवर्गासाठी येथील सभापतीपद राखीव आहे. त्यामुळे पिंपळगाव काळे गणातून विजयी झालेल्या सविता राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. विद्यमान सभापती नंदा वनारे व उपसभापती विजय काळे हे आहेत. उपसभापतीपदीप्रसंगी अशोक काळपांडे यांच्या नावाची चर्चा होऊ शकते.

विधानसभा डोळ्यासमोर ठेवून निवड होणे शक्य
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच चिखलीतील सभापती, उपसभापतींची निवड होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक असलेल्या चिखली पंचायत समितीमध्ये सध्या माधुरी देशमुख या सभापती विराजमान आहेत. यापूर्वी काँग्रेसने शेतकरी संघटनेचे भानुदास घुबे यांना उपसभापतीपद देऊन काँग्रेसची सत्ता पंचायत समितीमध्ये स्थापन केली होती. मात्र, विधानसभा निवडणुका पाहता काँग्रेसला राष्ट्रवादीला येथे सोबत ठेवणे सध्या क्रमप्राप्त वाटते राष्ट्रवादीला चिखलीत उपसभापतीपदाचा लाभ होण्याची शक्यता आहे.

मलकापुरात रस्सीखेच, अपक्षांच्या खांद्यावर काँग्रेस, भाजपची मदार
सहा सदस्यीय मलकापूर पंचायत समितीमध्ये अपक्षांच्या खांद्यावर काँग्रेस, भाजपची मदार असून, येथे सभापतीपदासाठी चांगलीच रस्सीखेच आहे. प्रसंगी अभद्र युती होण्याचीही शक्यता येथे नाकारता येत नाही. त्यानुषंगाने येथे वेगवान राजकीय घडामोडी होत आहे. ज्ञानदेव वाघोदे हे विद्यमान सभापती असून, उपसभापतीपदी विमल धाडे या आहेत. मलकापूर पंचायत समितीमध्ये स्पष्टपणे कोणालाच बहुमत नसल्याने जो तो राजकीय समीकरणे जुळवण्याच्या भानगडीत गुंतल्याचे सध्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या संध्या देशमुख, विनोद क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विमल धाडे, भाजपचे दादाराव तायडे, अपक्ष ज्ञानदेव वाघोदे व विद्या नारखेडे, असे येथील सदस्य आहेत. सहापैकी तीन महिला सदस्य असून, तिघीही सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. गेल्या अडीच वर्षांच्या काळात येथे बरेच पाणी पुलाखालून गेले आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम
सकाळी १० ते १२ नामांकन पत्रे स्वीकारणे
१२ ते दोन मध्यांतर
दोन वाजता बैठकीला प्रारंभ
२.०५ ते २.१० वैध नामांकन पत्राची घोषणा
२.२५ पर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत
त्यानंतर निवडणूक होऊन विजयी उमेदवाराची घोषणा करणे

संग्रामपुरतामध्ये भाजपला आशा
संग्रामपूर पंचायत समितीमध्ये भाजप सेनेची सत्ता असून, भाजप चार व सेना दोन आणि भारिप-बमसं दोन, असे पक्षीय बलाबल आहे. येथे पांडुरंग हागे यांची सभापतीपदी निवड होण्याची शक्यता आहे. सभापतीपद हे ओबीसीसाठी राखीव आहे.

शेगाव ओबीसीसाठी
शेगाव पंचायत समितीसभापतीपद हे ओबीसीसाठी राखीव आहे. सहा सदस्यीय पंचायत समितीमध्ये चार भारिप-बमसं आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य येथे आहे. भारिप-बमसंच्या मित्र वृंदा फुंडकर यांची सभापतीपदी निवड जवळपास निश्चित आहे.