आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीमध्ये भाजपचे ठरले बेरजेचे राजकारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्ह्यातील सात पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मूर्तिजापूरमध्ये सभापतीपद मिळवण्यात भाजपला यश आले आहे. अकोला पंचायत समितीचे उपसभापतीपद शिवसेनेच्या साह्याने भाजपने प्राप्त केले आहे. मूर्तिजापूर, बाळापूर, पातूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचे मते मिळवत बेरजेचे राजकारण केले.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून दुसर्‍या स्थानावर राहिला आहे. जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांमधील 106 जागांपैकी 21 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. अकोला पंचायत समितीत शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे अकोला पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या गंगुबाई धामोळे, तर उपसभापतीपदी भाजपच्या शारदा गावंडे यांची बिनविरोध निवड झाली. अकोला पंचायत समितीत शिवसेनेचे आठ सदस्य आहेत. त्यामुळे भाजपच्या वाट्याला उपसभापतीपद आले. मूर्तिजापूर पंचायत समितीचे सभापतीपद ईश्वरचिठ्ठीच्या मदतीने भाजपने मिळवले आहे. मूर्तिजापूरमध्ये भाजपचे 3, तर शिवसेनेचे 2 सदस्य आहेत. या ठिकाणी काँग्रेसच्या एकमेव सदस्याने युतीला पाठिंबा दिला, तर राष्ट्रवादी काँग्रेसने भारिप-बमसंला पाठिंबा दिल्याने दोन्ही बाजूंचे संख्याबळ सहा झाले. बहुमतासाठी सातचा आकडा कोणीही मिळवू न शकल्याने ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून सभापती व उपसभापतीची निवड करण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या शुभांगी खंडारे यांना सभापतीपद मिळाले, तर उपसभापतीपद काँग्रेसकडे गेले.

बार्शिटाकळी पंचायत समितीत भाजपचा एकमेव पंचायत समिती सदस्य आहे. अकोट पंचायत समितीतही तीच परिस्थिती असून, भाजपचा एकच सदस्य आहे. त्यामुळे तिथे भाजप सभापती किंवा उपसभापतीपदाच्या शर्यतीत नव्हता. पातूर व बाळापूर पंचायत समितीत भाजपचे प्रत्येकी तीन पंचायत समिती सदस्य आहेत. पातूर व बाळापूर पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांची मते प्राप्त केली. दोन्ही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना प्रत्येकी सहा मते मिळाली. सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपने बेरजेचे राजकारण केले. या सोबतच पक्षाला मूर्तिजापूरमध्ये केवळ तीन सदस्य असतानाही ईश्वरचिठ्ठीच्या माध्यमातून सभापतीपद मिळाले. त्यामुळे भाजपला जागांसोबतच सभापतीपदाचाही लाभ झाला.