आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्‍याच्‍या सभापतीपद कोण होणार आरुढ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - येथील पंचायत समिती सभापतीपदाची निवड शनिवारी होणार्‍या सभेत होणार आहे. पंचायत समितीमध्ये शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पंचायत समितीवर भगवा फडकणार असल्याचे निश्चित आहे. सभापतीपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंचायत समितीच्या 28 गणांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक शिवसेना 9, भाजप 8, भारिप-बहुजन महासंघ 6, काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2 व अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळवला. पंचायत समितीवर शिवसेना-भाजप युतीने विजय मिळवला. सभापतीपद महिला सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. शिवसेनेत गंगा अंभोरे, गंगूबाई धामोळे, कौशल्याबाई सिरसाट यांची नावे चर्चेत आहेत. भाजपने एका अपक्षाचा पाठिंबा मिळवून सभापतीपदावर दावा केला आहे. मात्र, सर्वात मोठा पक्ष असल्याने शिवसेना ठाम आहे. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते तोडगा काढणार असल्याची चर्चा आहे.
अशी असेल प्रक्रिया
सकाळी 11 ते 1 - नामनिर्देशन अर्ज दाखल करणे
दुपारी 3 वाजता - विशेष सभा
सायं. 5 वाजता - सभापतीपदाची अधिकृत घोषणा
एकूण जागा 106 ,अपक्ष 03, शिवसेना 15, राष्ट्रवादी 06, काँग्रेस 13, भाजप 21, भारिप-बमसं 48,
पक्षीय बलाबल कुणाकडे जाणार कोणत्या पंचायत समिती
अकोला पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी चुरस
जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी 28 डिसेंबरला निवडणूक होत आहे. सभापतीपदी कोण आरूढ होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सातपैकी अकोला, अकोट, मूर्तिजापूर आणि तेल्हारा या चार पंचायत समितीचे सभापतीपद महिलांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे त्या पंचायत समितींमध्ये महिलाराज येणार आहे. सभापतीपदाच्या निवडप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अकोला, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शिटाकळी, बाळापूर, पातूर येथील तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पातूरमध्ये काँग्रेसच्या मदतीने भारिप-बमसं सत्तेत येण्याची शक्यता
येथे भारिप-बमसंने काँग्रेसच्या मदतीने सत्तेत येण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. येथील उपसभापतीपद काँग्रेसच्या एकमेव सदस्य सरस्वती बोमटे यांना मिळण्याची शक्यता आहे, तर सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असून, अद्याप कोणाचेही नाव समोर आलेले नाही. पंचायत समितीच्या 10 जागांपैकी 5 जागा भारिप-बमसं, 3 भाजप, 1 काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. येथे सर्वाधिक जागा भारिप-बमसंने मिळवल्या असून, या पदाकरिता आता सर्वच उमेदवार पात्र आहेत. सर्वाधिक जागा भारिप-बमसंच्या असल्याने ते समविचारी असल्याने काँग्रेसची मदत घेण्याच्या तयारीत आहेत.
मूर्तिजापूरमध्ये सुमित्रा किर्दक, शुभांगी खंडारे यांची चर्चा
येथील पंचायत समितीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आहे. सत्तास्थापनेसाठी भारिप-बमसं आणि भाजप-शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुमित्रा किर्दक दावेदार आहेत. किर्दक यांना पाठिंबा देऊन भारिप उपसभापतीपद स्वत:कडे ठेवूशकतो. भाजपकडे शुभांगी खंडारे या सदस्या आहेत. 12 सदस्यांपैकी भाजप-शिवसेनेचे संख्याबळ पाच आहे. भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सत्तास्थापनेचा प्रयत्न होत आहे. दुसरीकडे भारिप-राष्ट्रवादी व काँग्रेस असे समीकरण बनत असून, सुमित्रा किर्दक यांचा मार्ग मोकळा आहे.
अकोटमध्ये भारिप-बमसंला मिळणार सभापतीपद
येथील पंचायत समितीमध्ये 14 पैकी 8 जागा मिळवणार्‍या भारिप-बहुजन महासंघाच्या सदस्याची सभापतीपदासाठी निवड निश्चित समजली जात आहे. पंचायत समितीत भारिप-बहुजन महासंघाने 8, काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1, भाजप 1 आणि अपक्षांनी 2 जागा मिळवल्या आहेत. अपक्षांपैकी एका सदस्याने शिवसेना सर्मथित उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. पंचायत समितीच्या रुईखेड गणाच्या सदस्या सुनीता कासदे भारिप-बमसंसोबत आहेत. त्यामुळे भारिप-बमसंची संख्या 9 झाली आहे. अकोट पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. भारिप-बमसंकडे सभापतीपदासाठी अकोलखेड गणाच्या अंजना तायडे या एकमेव सदस्या आहेत. उपसभापतीही याच पक्षाचा राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. उपसभापतीपदासाठी रमेश आकोटकर आणि मुश्ताक पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.
बाळापूरमध्ये सभापतीपदाकडे नागरिकांचे लक्ष
येथील पंचायत समितीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सभापती कोण होणार, याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे. भारिपचे सात सदस्य असले तरी या पक्षाला सत्ता स्थापण्यासाठी एक सदस्य कमी पडत आहे. काँग्रेसने मदत केल्यास सभापतीपद भारिपला मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीत भारिपने सात, भाजप तीन, काँग्रेस तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा मिळवली आहे. काँग्रेसच्या मदतीने भारिपचा सभापती होण्याची शक्यता अधिक आहे. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास या पक्षांचे सात, तर दुसरीकडे भारिपचे सात अशी एकसमान सदस्यसंख्या होऊन ईश्वरचिठ्ठीने सभापतीची निवड होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव असून, भारिपकडे गोदावरी इंगळे व निरंजन सिरसाठ हे दोघे सदस्य आहेत. भाजपकडे शकुंतला वानखडे व रविकांत इंगळे हे सदस्य आहेत. पुढे काय घडामोडी घडणार, याकडे लक्ष नागरिकांचे लागले आहे.
बार्शिटाकळीत सभापतीपद भारिपकडे जाण्याची चिन्हे
येथील पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघ आणि काँग्रेसची युती होणार आहे. भारिप-बमसंकडे सभापतीपद राहणार असून, उपसभापती काँग्रेसचा होणार आहे. दोन्ही पक्षांत जवळजवळ हा निर्णय निश्चित झाल्याची माहिती आहे. भारिपतर्फे सुनील जाधव व सुरेखा जाधव, तर काँग्रेसतर्फे सतीश पवार यांच्या नावाची चर्चा आहे. पंचायत समिती निवडणुकीत 14 पैकी 7 जागा मिळवून भारिप-बहुजन महासंघ हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तसेच काँग्रेस व शिवसेनने प्रत्येकी तीन, तर भाजपला एक जागा मिळाली. सत्तेत येण्यासाठी इतर काही पक्षांचे सदस्यही भारिप-बमसंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पंचायत समितीवर भारिप-बमसंचा सत्तेचा झेंडा फडकणार आहे.
तेल्हार्‍यात भारिपची येणार सत्ता, पदाबाबत उत्सुकता
येथील पंचायत समितीच्या निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. असे असले तरी सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र, पक्षात सभापतीपदासाठी नजमोन्निसा शे. ग्यासोद्दीन व आशाताई इंगळे यांच्या नावाची चर्चा आहे. पंचायत समितीमध्ये भारिपने 14 पैकी 10 जागा मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले. त्यामुळे सभापती व उपसभापतीही भारिप-बमसंचाच होणार हे निश्चित झाले आहे. सभापतीपदाचे आरक्षण इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी आहे. भारिप-बमसंमध्ये या पदासाठी पाथर्डी गणातील सदस्य आशाताई इंगळे यांचे नाव आघाडीवर असून, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन:
सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी केले आहे.