आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला पंचायत समिती : पाच ठिकाणी भारिप-बमसंची सरशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्ह्यातील सात पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. यामध्ये सर्वाधिक पाच ठिकाणी भारिप-बहुजन महासंघाच्या सदस्यांची सभापतीपदी निवड झाली.

अकोला : सभापतीपदी शिवसेनेच्या गंगुबाई धामोळे, तर उपसभापतीपदी भाजपच्या शारदा गावंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी मलकापूर क्रमांक दोन या गणातून निवडून आलेले अपक्ष सदस्य विशाल आखरे यांनी शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले. निवड प्रक्रियेदरम्यान ते तटस्थ राहिले.

अकोट : सभापतीपदी भारिप-बहुजन महासंघाच्या अंजना तायडे यांची निवड झाली. सुनीता कासदे यांनी भारिप-बहुजन महासंघात प्रवेश केल्याने त्यांना उपसभापतीपदासाठी संधी देण्यात आली. दोघांचीही बिनविरोध निवड झाली.

मूर्तिजापूर : सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत दोन्ही पदांसाठीच्या उमेदवारांना सारखी मते पडली. त्यामुळे या दोन्ही पदांसाठी ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये सभापतीपदी भाजपच्या शुभांगी डिगांबर खंडारे, उपसभापतीपदी काँग्रेसचे उमेश वसंतराव मडगे यांची निवड झाली. दोन्ही सदस्यांना सहा-सहा मते मिळाली. उपसभापतीपदासाठी काँग्रेसचे उमेश मडगे व भारिप-बहुजन महासंघाच्या योगिता रोकडे यांनाही सहा-सहा मते मिळाली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली.

बार्शिटाकळी : सभापतीपदी भारिप-बहुजन महासंघाचे डॉ. सुनील जाधव यांची निवड झाली. काँग्रेसचे सैयद फारुक यांनी भारिप-बहुजन महासंघाशी हातमिळवणी करत उपसभापतीपद मिळवले. डॉ. सुनील जाधव यांनी काँग्रेसचे उमेदवार सतीश पवार यांचा पराभव केला, तर सैयद फारुक यांनी शिवसेनेच्या शुभांगी ठाकरे यांना पराभूत केले.

तेल्हारा : सभापतीपदी भारिप-बहुजन महासंघाच्या लीलाबाई गावंडे यांची तर उपसभापतीपदी मधुकर पोके यांची निवड झाली. लीलाबाई गावंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

पातूर : सभापतीपदी भारिप-बहुजन महासंघाचे संजीव लोखंडे यांची निवड झाली.

बाळापूर : सभापतीपदी भारिप-बहुजन महासंघाचे निरंजन सिरसाठ, तर उपसभापतीपदी प्रशांत मानकर यांची निवड झाली. भारिप-बहुजन महासंघाच्या सात सदस्यांसोबत काँग्रेसचे सदस्य प्रशांत मानकर यांनी हातमिळवणी केली.