आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशिम पंचायत समिती : काँग्रेस-राष्ट्रवादीची पाच जागी सत्ता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम - जिल्ह्यातील सहा पंचायत समितींचे सभापती आणि उपसभापतींची शनिवारी दुपारी निवड झाली. कारंजालाड, मानोरा आणि वाशिम पंचायत समितींमध्ये काँग्रेसचा सभापती झाला, तर मंगरुळपीर आणि मालेगावमध्ये सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याची निवड झाली. वीस वर्षांपासून कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या रिसोड पंचायत समितीवर पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकला असून, तिथे मनसेचा सभापती, तर शिवसेनेचा उपसभापती झाला.

जिल्ह्यातील कारंजालाड आणि वाशिम पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण, रिसोड सर्वसाधारण महिला, मालेगाव अनुसूचित जाती महिला, मानोरा ओबीसी महिला आणि मंगरुळपीर पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी व्यक्तीसाठी राखीव आहे. पंचायत समितींमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी शनिवारी पदभार स्वीकारून सभापती आणि उपसभापतींची निवड केली.

वाशिम : वाशिम पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे वीरेंद्र देशमुख, तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मो. इम्रान मो. अनिस निवडून आलेत. हे पद सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुले होते. त्यांच्या विरोधात सभापतीपदासाठी शिवसेनेचे भगवान ढोके, तर उपसभापतीपदासाठी आशा गोरे होत्या. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवाराला भारिप-बमसं आणि अपक्षांनी मते दिली. त्यांना 18 पैकी 16 मते पडली, तर शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना तीन मतांवर समाधान मानावे लागले.

कारंजालाड : सर्वसाधारण व्यक्तीसाठी असलेल्या येथील पंचायत समिती सभापतीपदासाठी कॉंग्रेसच्या एकमेव सदस्य असलेल्या वर्षा नेमाणे, तर भाजपचे र्शीकांत खंडागळे यांनी नामाकंन अर्ज दाखल केले होते. उपसभापतीपदासाठी भारिप-बमसचे प्रमोळ लळे आणि शिवसेनेचे रवी भूते यांनी अर्ज केला होता. यापैकी सभापतीपदी कॉंग्रेसच्या नेमाणे तर उपसभापतीपदी भारिप-बमसंचे लळे हे आठ मते घेऊन निवडून आलेत, तर भाजप आणि शिवसेनेच्या मतदाराला सात मते मिळालीत. बसपचा एक सदस्य तटस्थ राहिला. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पाच, भारिप-बमसंच दोन, कॉंग्रेसचा एक सदस्य आहे.

मालेगाव : अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या येथील पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कुसुम लबडे या निवडून आल्या, तर उपसभापतीपदी कॉंग्रेसचे शिवाजी बकाल यांची वर्णी लागली. त्यांच्याविरोधात सभापतीपदासाठी भाजपच्या नंदा गवई, तर उपसभापतीपदासाठी संजय देशमुख उभे होते. या पंचायत समितीमध्ये भाजपचे सर्वाधिक सात सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र, त्यांच्या सदस्याशिवाय इतर एकाही सदस्याने त्यांना मते दिली नसल्याने भाजपला पराभव स्वीकारला लागला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, भारिप आणि अपक्ष या सर्वांचे एकूण 12 मते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पडली.

रिसोड : सर्वसाधारण महिलेसाठी असलेल्या येथील सभापतीपदी मनसेच्या यशोदा भाग्यवंत तर उपसभापती शिवसेनेचे महादेव ठाकरे हे निवडून आलेत. त्यांच्याविरोधात सभापतीपदासाठी भाजपच्या छाया पाटील, तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गजानन बाजड होते. मनसेच्या भाग्यवंत आणि शिवसेनेचे ठाकरे यांना अकरा मते मिळालीत. पाटील आणि बाजड यांना सात मतांवर समाधान मानावे लागले. या ठिकाणी कॉंग्रेसच्या तीन सदस्यांनी मनसे आणि शिवसेनाला विनाअट मतदान केले.

मानोरा : ओबीसी महिलेसाठी असलेल्या येथील सभापतीपदी कॉंग्रेसच्या धनर्शी राठोड, तर उपसभापती शिवसेनेचे अभिजित पाटील यांची अविरोध निवड झाली. या ठिकाणी पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, तर शिवसेना आणि कॉंग्रेसचे प्रत्येकी तीन-तीन उमेदवार निवडून आलेत. मतदारांनी सहा अपक्षांना निवडून दिले. दरम्यान, अपक्ष असलेले पाटील यांनी निवडणुकीनंतर शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यांची उपसभापती निवड झाली.

मंगरुळपीर : ओबीसी व्यक्तीसाठी राखीव असलेल्या येथील सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भास्कर पाटील शेगीकर, तर उपसभापतीपदी मनसेच्या धनर्शी काथडे निवडून आल्यात. त्यांना प्रत्येकी दहा मते पडली. त्यांच्याविरोधात सभापतीपदासाठी असलेले भाजपचे सुभाष शिंदे आणि उपसभापतीपदाचे उमेदवार नीलिमा देशमुख यांना सहा मतांवर समाधान मानावे लागले.