आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारसचा नवीन संच 1431 कोटींचा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विविध कारणांमुळे रखडलेल्या महानिर्मितीच्या प्रकल्पांच्या उभारणी खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक विद्युत केंद्राच्या नवीन संचाच्या उभारणी खर्चाची किंमत आता 1431 कोटींवर पोहोचली आहे. या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय किंमत सुमारे एक हजार कोटी एवढी होती. प्रकल्प उभारणीचा वाढीव खर्च ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाणार आहे.

महानिर्मितीच्या नवीन प्रकल्पांच्या खर्चात होत असलेली वाढ हा ग्राहकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. राज्यातील पारस, खापरखेडा व परळी येथे तीन नवीन संचांची उभारणी करताना अनेक अडथळ्यांचा सामना महानिर्मिती कंपनीला करावा लागत आहे. यात मोठा कालावधी निघून गेला. त्यामुळे संच उभारणीच्या खर्चात वाढ झाली आहे. संच उभारणीसाठी लागलेल्या विलंबाचा फटका आता ग्राहकांनाच बसणार आहे. या प्रकल्पांच्या भांडवली खर्चाला राज्य नियामक आयोगाने मान्यता दिली. त्यामुळे पुढील सहा महिने प्रती युनिट मागे 25 ते 35 पैशांचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे.

राज्यात नवीन संच उभारताना भूसंपादनातील अडचणी, ‘भेल’कडून यंत्रसामग्री मिळण्यासाठीची कसरत, इंधन खर्चातील भाववाढ आदी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात महानिर्मिती कंपनीने राज्य वीज नियामक आयोगापुढे आपली बाजू मांडली. त्यानंतर आयोगाने वाढीव खर्चाला मंजुरी दिली. पारसच्या 250 मेगावॉटच्या नवीन संचासाठी 1431 कोटींच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. पारसच्या नवीन संचासाठी भूसंपादनाचा प्रo्नही मार्गी लागल्याने आता या नवीन संचाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महावितरण करणार वसुली
नवीन प्रकल्प उभारणीसाठी वाढलेला खर्च वीज बिलापोटी ग्राहकांकडून महावितरणला वसूल करावा लागणार आहे. प्रकल्पांच्या खर्चासाठी प्रती युनिट मागे 25 ते 35 पैसे वीज ग्राहकांना अतिरिक्त मोजावे लागतील.

प्रकल्पाचे कार्य तत्काळ सुरू करावे
पारसच्या नवीन संचासाठी भूसंपादन करताना शेतकर्‍यांचा अडथळा महानिर्मिती कंपनीला झाला नाही. नवीन प्रकल्प उभारण्यासाठी शेतकर्‍यांनी सहकार्यच केले आहे. नवीन प्रकल्पामध्ये काही अडथळे येणारच. मात्र, आता प्रकल्पाचे कार्य तत्काळ सुरू करावे. लक्ष्मणराव तायडे, काँग्रेस नेते, अकोला.