आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत बांधकामावर अर्धवट कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जुन्या कापड बाजारातील जे.जे. मेन्सवेअर या दुकानाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गुरुवारी 6 फेब्रुवारीला गेलेल्या मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकास अपुर्‍या पोलिस बंदोबस्तामुळे कारवाई अर्धवट सोडावी लागली. महापालिकेच्या गाडीवर दगडफेक होत असताना पोलिसांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेची चर्चा बाजारपेठेत होती. महापालिका प्रशासनाने जगदीश गुरबानी, त्यांचे आई-वडील व इतरांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची पोलिस तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, जे.जे. मेन्सवेअरचे संचालक जगदीश गुरबानी यांनी कारवाई थांबवण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप केला. मात्र, खंडणी मागणार्‍याचे नाव त्यांनी सांगितले नाही.
महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने 6 फेब्रुवारीला दुपारी जुना कापड बाजारातील रस्त्यावर आलेले जे.जे. मेन्सवेअरचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी धाव घेतली. दुकानाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी 28 जानेवारीला महापालिकेचे पथक गेले होते. पण, त्या वेळी दुकानाच्या मालकांनी चार दिवसांत अनधिकृत बांधकाम पाडण्याचे लेखी आश्वासन दिले होते. पण, दुसरीकडे त्यांनी न्यायालयातून याप्रकरणी स्थगनादेश आणण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही. महापालिका पथकाने आज हे बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला. परंतु, अपुरा बंदोबस्त व हातावर हात ठेवून उभे असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांमुळे महापालिका पथकाला कारवाई करता आली नाही. येथे कारवाईसाठी आलेल्या महापालिकेच्या जेसीबीवर झालेल्या दगडफेक ीत गजराजचे चालक मधुकर कांबळे जखमी झाले. त्यानंतर येथे धावपळ झाली. येथे जोरदार दगडफेक झाल्याची अफवा बाजारपेठेत पसरली होती. दुकाने बंद करण्याचे काही व्यापार्‍यांनी केलेल्या आवाहनास अनेकांनी प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, जे.जे. मेन्सवेअरवर कारवाईसाठी गेलेल्या पथकाला जगदीश गुरबानी यांच्या परिवाराने विरोध केला. त्यांनी जेसीबी समोर लोळण घेऊन कारवाईत अडथळा आणला. काही असामाजिक तत्त्वांनी येथे दगडफेक करत कारवाईत बाधा आणली.
दहा लाखांची मागणी
आज कारवाईच्या ठिकाणी जगदीश गुरबानी यांनी दहा लाखांची खंडणीची मागणी झाल्याचा आरोप केला. याची दखल पोलिसांनी घेतली नाही. दरम्यान, याबाबतची चर्चा फिसकटल्याची चर्चादेखील आहे.
जे.जे.मेन्सवेअरचे बांधकाम अनधिकृत
जे.जे. मेन्सवेअरचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक 28 जानेवारीला गेले होते. पण, त्या वेळी दुकानाचे मालक जगदीश गुरबानी यांनी चार दिवसांत अनधिकृत बांधकाम स्वखर्चाने पाडण्याचे आश्वासन दिले होते. पण, त्यांनी ते न पाडल्याने आज तक्रारकर्त्याने महापालिकेत दाद मागितली. अखेर 233 चौरसमीटर क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी पथकाने पुढाकार घेतला होता. मात्र, आज अर्धवट कारवाई करण्यात आली.
भाजप फ्रंटवर
गोरक्षण रोडवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी भाजपच्या दोन नगरसेवकांनी केली. त्याचवेळी भाजपचे विरोधी पक्षनेता हरीश आलिमचंदानी यांनी जुना कापड बाजारपेठेतील जे.जे.मेन्सवेअरवर अनधिकृत बांधकामापोटी दरवर्षाला 43 हजार दंड भरत असल्याचे निदर्शनास आणून दिले. हा दंड वसूल करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. अनधिकृत बांधकामाचे सर्मथन करत नाही. पण, अशी वसुली कशासाठी करत आहे, असा मुद्दा भाजपने उपस्थित केला.
जेसीबीवर झालेल्या दगडफेकीत गजराजचे चालक जखमी
पुरुषोत्तम साधवाणी आणि गोविंद सोढ्ढा यांचे पहिल्या मजल्याचे 166 चौ.मीटर क्षेत्रफळाचे व तितकेच दुसर्‍या मजल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी मालकांनी 27 जानेवारी रोजी 10 दिवसांची मुदत मागितली होती. दहा दिवस पूर्ण झाल्यावरही त्यांनी अनधिकृत बांधकाम पाडले नाही. असे असताना हे अनधिकृत बांधकाम पाडले जाते की नाही, अशी चर्चा बाजारपेठेत जोरदार रंगली होती. या अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक बाळ टाले व कल्पना गावंडे यांनी केली आहे. दरम्यान, या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई करून ते पाडण्याची मागणी करणार्‍या नगरसेवकांची चुप्पी का, असा अर्थपूर्ण प्रश्न विचारला जात आहे.
बंदोबस्त नाही
पोलिसांचा बंदोबस्त उपलब्ध नाही. त्यामुळे त्या दृष्टीने काम करावे. या रस्त्याने धार्मिक मिरवणूक निघत असल्याने बाजारपेठेत तणाव निर्माण होत आहे.’’ जगदीश गायकवाड ठाणेदार, सिटी कोतवाली
पोलिसांचा अपुरा बंदोबस्त
पोलिसांचा अपुरा बंदोबस्त मिळाल्याने ही कारवाई थांबवली आहे. या ठिकाणी आज जे.जे.मेन्सवेअरचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला असता, गुरबानी परिवाराने सरकारी कामात अडथळा आणला. काहींनी जेसीबी चालकांवर दगडफेक केली. यात जेसीबीची काच फुटली व चालकास दगड लागला आहे. पोलिसांनी बंदोबस्त दिल्यावर 10 फेब्रुवारी रोजी कारवाई करू.’’ जी. एम. पांडे क्षेत्रीय नियंत्रण अधिकारी, महापालिका