मूर्तिजापूर - मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर नेहमीप्रमाणे येणारी दुपारची नरखेड भुसावळ पॅसेंजरचे सोमवारी, मे रोजी इंजिन अचानक बंद पडले. दुसरे इंजिन लावून पुढचा प्रवास गाठणार्या गाडीला तब्बल दोन तास विलंब झाला. भरउन्हात प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
दुपारी २.४२ वाजता प्लॅटफार्मवर नरखेड-भुसावळ पॅसेंजर उभी होती. यादरम्यान, मागून येणारी गाडी कोल्हापूर-महाराष्ट्र एक्स्प्रेस नेहमीप्रमाणे रेल्वेस्थानकावर आली. मात्र, प्लॅटफार्मला लागून असणारी एक्स्प्रेस मात्र, या वेळी यार्ड साइड ट्रॅकवर म्हणजेच विनाप्लॅटफार्मवर थांबली. दरम्यान, चढणार्या उतरणार्या प्रवाशांना मात्र, वेळप्रसंग पाहून कायद्याला फाटा देत रेल्वे रूळ पार करणे भाग पडले. यामधील प्रवाशांनी प्लॅटफार्मवरून पॅसंेजरमध्ये त्यातून महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये चढ-उतार करून
आपली यात्रा केली.
बंद अवस्थेत असलेल्या इंजिनला तोडगा म्हणून उप स्टेशन अधीक्षक वानखडे यांनी नरखेड पॅसेंजर डब्ल्यू डीपी १३६६४ क्रमांकाचे इंजिन बिघाड झाले असल्याचे वरिष्ठांना कळवले. त्यानुसार बडनेरावरून नवीन ३१३८७ क्रमांकाचे इंजिन मागवण्यात आले. नेहमी डिझेल इंजिनसोबत धावणारी गाडी ४.२२ वाजता इंजिनच्या सोबतीने मार्गस्थ झाली. या प्रक्रियेला तब्बल दोन तास लागल्याने प्रवाशांना ४१ अंश तापमानाचा सामना करावा लागला.