आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेब, बस करा आता, पोटाची आग आमच्या डाेक्यात गेली हो’- कर्मचाऱ्यांचे आंदाेलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पाच महिन्यांच्या थकित वेतनासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी काहीही तोडगा निघाल्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले. संध्याकाळी कर्मचारी संघर्ष कृती समितीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर घेतलेल्या सभेत महापालिका प्रशासनाला सुनावताना कर्मचारी म्हणाले, की ‘साहेब, आता बस करा, पोटाची आग काय असते, हे तुम्हाला ठाऊक नसेल, पण ती आग आता डोक्यात गेली हाे’. गुरुवारपासून या आंदोलनामध्ये अत्यावश्यक सेवा सहभागी होणार असून, पाणीपुरवठा, अग्निशमन आणि आरोग्य सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा या वेळी कृती समितीने दिला आहे.

कर्मचाऱ्यांच्या वेतनावर प्रशासनाने काहीही तोडगा काढल्यामुळे २३ जानेवारीपासून महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले. मात्र, त्या दिवसापासून सुट्या आल्यामुुळे महापालिकेच्या कामकाजावर फारसा परिणाम पडला नव्हता. मात्र, मंगळवारी कामकाजाचा पूर्ण दिवस असल्यामुळे परिणाम पडला. या दिवशी अत्यावश्यक सेवेचे विभाग सोडून इतर सर्व विभाग बंद हाेते.

कर्मचारी कृती संघर्ष समितीकडून प्रशासनाला ४५ दिवसांपूर्वी रीतसर नोटीस देण्यात आली होती. या वेळी संघर्ष समितीने पाच महिन्यांच्या थकित वेतनाची मागणी लावून धरली आहे. प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर आणि उपायुक्त दयानंद चिंचोलीकर दोन्ही महत्त्वाचे अधिकारी रजेवर गेले आहेत.गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता, काही करत नाही

प्रशासन म्हणते, तिजोरीत १६ कोटी, कर्मचारी म्हणतात, २५कोटी
मनपाच्या तिजोरीत पाच महिन्यांचे वेतन करण्यापुरता पैसाच नाही. केवळ १५ ते १६ कोटी रुपये असावेत, अशी माहिती सहायक आयुक्त माधुरी मडावी यांनी दिली. त्यावर कर्मचारी कृती समितीचे म्हणणे आहे की, २५ कोटी रुपये तिजोरीत आहेत. ती रक्कम आम्हाला द्या, असा वाद मंगळवारी चालला. या वेळी मडावी या कर्मचाऱ्यांच्या बाजूने असून, त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे.

कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या भूलथापांना बळी पडू नये
प्रशासनानेकर्मचाऱ्यांमध्ये आपापसात भांडणे लावण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्या भुलथापांना कुणीही बळी पडू नये. पाच महिन्यांचे वेतन घेतल्याशिवाय आणि जोपर्यंत ठोस काहीही मिळत नाही तोपर्यंत आंदोलनात फूट पडणार नाही, असा निर्धार कृती समितीने केला आहे. तर प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
^महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. दोन आमदार भाजपचे, खासदार भाजपचेच आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे. आता तर पालकमंत्रीही अकोल्याचे आहेत. मात्र, आजपर्यंत त्यापैकी कुणीही आम्हाला चर्चेसाठी बोलावले नाही. यांनी मनात आणले तर आमचा प्रश्न सुटू शकतो. मात्र, त्याचा उपयोग होत नाही. आम्ही गुरुवारपासून अत्यावश्यक सेवांनाही संपात सहभागी करणार आहोत. पी.बी. भातकुले, अध्यक्ष, मनपा कर्मचारी संघर्ष समिती