आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताट-वाटी वाजवून कर्मचाऱ्यांनी केला निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पाचमहिन्यांच्या थकीत वेतनासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिका कर्मचारी संघर्ष समितीने आठ डिसेंबरपासून आंदोलनाला प्रारंभ केला. पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी महापालिका कार्यालय परिसरात ताट-वाटी वाजवून निषेध व्यक्त केला. टप्प्याटप्प्याने आंदोलन करून मागण्या निकाली निघाल्यास २३ जानेवारीपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांचे थकीत वेतन, पाचव्या वेतन आयोगातील फरकाची थकीत रक्कम, शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १०० टक्के अनुदान मिळाल्याशिवाय एलबीटी बंद करू नये, कालबद्ध वेतनश्रेणी विनाविलंब लागू करावी, सेवा उपदान, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधीच्या प्रलंबित रकमा त्वरित द्याव्यात, पडीत वॉर्ड बंद करून मानधन तत्त्वावर ४०० सफाई कामगारांची नियुक्ती करावी, अनुकंपा तत्त्वावर पदे भरण्यात यावीत, मानसेवी कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी आदी विविध मागण्यांची पूर्तता होण्यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय महापालिका कर्मचारी संघर्ष समितीने घेतला आहे. प्रशासनासोबत थकीत वेतनाबाबत वारंवार चर्चा झाली. मात्र, महापालिकेत एक महिन्याचे वेतन देण्याइतका पैसा असतानाही वेतन देण्याच्या प्रशासनाच्या या कृतीमुळे अखेर कर्मचारी संघर्ष समितीने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने दोन डिसेंबरला संघर्ष समितीने प्रशासनाला निवेदनही दिले.
या निवेदनात आठ डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला होता. निवेदन दिल्यानंतरही प्रशासनाने चर्चा केल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी ताट-वाटी वाजवून आंदोलनाचा पहिला टप्पा पूर्ण करत थकीत वेतनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टप्प्यात १० ते १२ डिसेंबर यादरम्यान कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत, तर २३ डिसेंबरला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मोर्चा आणि २३ जानेवारीपासून कामबंद आंदोलन केले जाणार आहे.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांनी साेमवारी ताट-वाटी वाजवा आंदोलन केले.