आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबाखूजन्य पदार्थांमुळे महिन्याला अकोल्यात कॅन्सरची 25 रुग्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - गुटखाबंदीच्या निर्णयाला एक वर्षांची मुदतवाढ देताना राज्य सरकारने आता मावा, खर्रा, सुगंधित सुपारी व सुगंधित तंबाखूवरही बंदी लागू केली आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे महिन्याकाठी शहरातील संत तुकाराम कर्करोग रुग्णालयात 25 रुग्ण दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोला शहरासह पश्चिम विदर्भात खर्राची मोठी बाजारपेठ आहे. खर्राच्या माध्यमातून अकोल्यात कोट्यवधींचा उलाढाल होतो.

नागरिकांवर तंबाखूजन्य पदार्थांमुळे दुष्परिणाम होऊ नये, म्हणून राज्यात गुटखाबंदी लागू करण्यात आली. या वर्षी त्याला 1 वर्षाची मुदतवाढ देत इतर तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी लादण्यात आली. मागील एका वर्षात गुटखाबंदीनंतर विदर्भात खर्‍र्याला विशेष मागणी आहे. वर्‍हाडी खर्रा, माजा खर्रा, 120 खर्रा, 160 खर्रा, 320 खर्रा आदींसह विविध प्रकारच्या खर्‍र्यांची शहरात मोठय़ा प्रमाणात विक्री होते. नुसती तंबाखू खाणार्‍यांची संख्याही मोठी आहे. गुटखाबंदीनंतर खर्रा खाण्याकडे मोर्चा वळवणार्‍यांची खर्रा बंदीनंतर पुन्हा एकदा पंचाईत झाली आहे.

तंबाखूजन्य पदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होते. कर्करोग झालेले सरासरी 25 रुग्ण महिन्याकाठी अकोल्यातील संत तुकाराम रुग्णालयात दाखल होतात. पश्चिम विदर्भात कर्करोगाच्या रुग्णांना तुकाराम रुग्णालयाचा आधार आहे. तंबाखूमुळे विविध पाच प्रकारचे कर्करोग होतात. या कर्करोगाचे चार टप्पे असतात. कर्करोगाचे निदान झाल्यावर पहिल्या टप्प्यातील रुग्ण साधारणत: पाच वर्षे, दुसर्‍या टप्प्यातील दोन ते तीन वर्षे, तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यातील रुग्ण सहा महिन्यांपर्यंत जीवन जगू शकत असल्याची माहिती संत तुकाराम रुग्णालयाच्या अधिकार्‍यांनी दिली.

गुटखा व खर्‍र्याची आयात
गेल्या वर्षभरापासून गुटखा बंदी केल्यामुळे राज्यात गुटखा विक्री नियंत्रण असल्याचा दावा अन्न व औषध प्रशासनाने केला आहे. मात्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरातमधून चोरट्या मार्गाने अकोल्यात गुटखा येतो. खुलेआमपणे शहरात गुटखा विक्री होत आहे. खर्‍र्याचीही दुसर्‍या जिल्ह्यातून अकोल्यात आयात होते. आता खर्‍र्याचा काळाबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


दरवाढ झाल्यामुळे सुपारीतही भेसळ
सुपारीचे दर वाढल्यामुळे आता सुपारीतही भेसळ होऊ लागली आहे. सुपारीत साधारणत: चिंचोक्यांच्या बियाण्यांची भेसळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासोबतच खाद्यपदार्थचे सुक्ष्म कण मिसळले जातात.


तंबाखूमुळे बळावले आजार
तोंड व्यवस्थित न उघडणे, तोंडाला फोडे येणे, जीभ जाड होणे, हिरड्यांचा भाग पांढरा होणे, दंतक्षय, दात सडणे, किडणे, आम्लपित्त, बद्धकोष्ठ, मुत्रपिंड निकामी होणे, पचन संस्था बिघडणे, ह्रदयविकार आदींसह कर्करोग सारखा दुर्धर आजार तंबाखूजन्य पदार्थामुळे होऊ शकतो. त्यामुळे तंबाखू खाणार्‍या रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत.


लहान मुलांमध्येही दिसून येतो कर्करोग
वयस्क व तरूणांमध्येच नव्हे तर आठ-दहा वर्षांच्या मुलांमध्येही तंबाखूजन्य पदार्थामुळे कर्करोग होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने गुटख्यानंतर खर्रा, मावा व इतर तंबाखू जन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.तंबाखू सेवनासह तंबाखूचा कीटकनाशक म्हणून व मासोळी मारण्यासाठीही वापर होतो. यामुळे शासनाने कर्करुग्णांचे वाढते प्रमाण पहाता तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात विक्री होणार्‍या खर्‍र्यामध्ये घातक पदार्थांचा समावेश असतो. यामध्ये पट्टा तंबाखू, गोडबोले तंबाखू, किमाम, चुना, सुपारी, ठंडाई आदींचा समावेश आहे. किमाम तीन प्रकारचे आहेत. यामध्ये चारमिनार, राजरत्न व नवरत्नचा समावेश आहे. किमाम तंबाखू सडवून त्यात सुगंधित द्रव्य घालून तयार होतो. तो आरोग्यासाठी घातक आहे.

वाढता वाढता वाढे दर
खर्‍र्यात प्रामुख्याने समावेश होणार्‍या सुपारी व तंबाखूच्या दरात गेल्या काही वर्षांत प्रचंड दरवाढ झाली आहे. खर्‍र्यामध्ये कच्ची व भुंजी सुपारीचा तीन प्रकारात समावेश होतो. दीड वर्षापूर्वी 120 रुपये किलो या दराने मिळणारी सुपारी आता 320 रुपये किलो या दराने विक्री होत आहे. तंबाखू पूर्वी दोन रुपयांना 12 ग्रॅम मिळत होता. आता चार रूपयाला सात ग्रॅम तंबाखू मिळतो.

खर्‍र्यासाठी यंत्राचा वापर
खर्रा पूर्वी हाताने घोटून दिल्या जात होता. खर्‍र्याची मागणी प्रचंड वाढल्यामुळे आता खर्रा घोटण्यासाठी यंत्राचा वापर करण्यात येतो. अमरावती एमआयडीसीमध्ये खर्‍र्याचा कारखाना आहे.त्यामुळे या मशीनची आता मोठय़ा प्रमाणावर मागणी वाढली आहे. बर्‍याच ठिकाणी या मशीनचा वापर होतो.

एक कोटीची उलाढाल
अकोला शहरात केवळ तंबाखूच्या माध्यमातून 1 कोटीची उलाढाल होत असल्याची माहिती तंबाखूच्या शहरातील ठोक व्यापार्‍यांनी दिली.


20 ते 40 वयोगटांतील रुग्ण
420 ते 40 वयोगटांतील रुग्णांची संख्या अधिक आह़े यावरील उपचार अत्यंत महागडे व दीर्घकालीन आहेत़ त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे हाच योग्य उपाय ठरेल. आता दहा वर्षाच्या वरील मुलेही तंबाखूजन्य पदाथार्ंचे सेवन करु लागली आहेत. ’’ डॉ. किरण लढ्ढा, घसा रोगतज्ज्ञ, अकोला

अपायकारक असल्याने बंदी योग्य
तंबाखूजन्य पदार्थ मानवी आरोग्यासाठी घातक असल्याने राज्य शासनाने केलेली बंदी योग्यच आहे. त्यामुळे कर्करोगाने होणारे मृत्यू कमी होतील. तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणार्‍यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर युवकांचा सहभाग आहे. ’’ नरेंद्र पटेल, तंबाखू व्यापारी, अकोला.