आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंद गुन्ह्यांची: पीक कर्जाच्या नावाखाली केली बँकेची फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - बनावट कागदपत्रे तयार करून पीक कर्जाच्या नावाखाली देना बँक आणि शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक, कृषी अधिकारी व शेतक र्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देना बँकेमार्फत वितरित केलेल्या पीक कर्जामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. तहसील कार्यालयाने या तक्रारीची चौकशी केली. नायब तहसीलदार चरणदास कोवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी रवींद्र अमृतराव बुरे (रा. रामगाव), गौतम दामोदर तायडे, दीपक नामदेव तायडे (रा. अकोला), बाळू देवराव रायबोले (रा. रामगाव), राहुल मधुकर चाटसे (रा. उमरी), गजानन मारोती जाधव (रा. रामगाव), दीपक मधुकर कंकाळ, सतीश साहेबराव गव्हाळे (रा. उमरी), रवींद्र हिरालाल तायडे (रा. अकोला), प्रमोद र्शीधर खंडेराव (रा. चोहोट्टा), नीळकंठ भीमराव आपोतीकर (रा. मारोडी), सुनील दिगंबर राऊत (रा. निपाणी), नाजुकराव गुलाबराव ताथोड (रा. रामगाव), बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र महादेव गुन्नाडे आणि कृषी अधिकारी कपिल नादर पटेल यांच्याविरुद्ध भादंविचे कलम 420 (फसवणूक), 409 (विश्वासघात), 467, 468, 471 (खोटे दस्तावेज तयार करून ते खरे असल्याचे भासवणे), 120 (ब) (कट कारस्थान रचणे), 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सहा जण गजाआड
बनावट कागदपत्रे तयार करून पिक कर्जाच्या नावाखाली देना बॅँक व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली. यामध्ये प्रवीण चौधरी, दीपक तायडे, राजू रामकृष्ण माने, कृषी अधिकारी काफिल, सुनील राऊत, नागेश केशव पागृत हे आहेत.


सहा जणांची चौकशी
सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे. तपासाअंती पुढील कार्यवाहीचा निर्णय घेण्यात येईल. सहा जणांची चौकशी करण्यात येत आहे.’’ जे. बी. गायकवाड, ठाणेदार, सिटी कोतवाली

बनावट कागदपत्रे तयार करून पिक कर्ज मिळवून देणारी एजंटांची टोळीच सक्रिय आहे. त्यांचे साटेलोटे बॅँका व कृषी विभागातील अधिकार्‍यांशी आहे. या प्रकरणातही काही एजंटांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. कर्ज मंजुरीसाठी ते 25 ते 30 टक्के रक्कम लाटतात.

अशी झाली फसवणूक
आपोतीकर नीळकंठ भीमराव यांच्या कर्ज प्रकरणाचीही चौकशी करण्यात आली. या कर्ज प्रकरणातील दस्तावेज योग्य असल्याचे आढळून आले. तसेच नाजुकराव ताथोड यांच्या कर्ज प्रकरणातही त्यांनी योग्य कागदपत्रे जोडण्यात आली, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले. असे असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

कर्ज मंजूर करताना कोणत्याही कागदपत्रांची चौकशी करण्यात आली नाही. तसेच कर्ज प्रकरणामध्ये बनावट 7/12, 8 अ, फेरफार तयार करण्यात आले. तसेच बोगस निरीक्षण अहवालही तयार करण्यात आला. या दस्तावेजांवर खोटे शिक्के मारून ते खरे असल्याचे भासवण्यात आले असल्याचे नायब तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांची अशीही ‘तत्परता’
सिटी कोतवाली ठाण्यात 4 जुलै रोजी अकोला अर्बन बँकेची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपी हे बडे मासे तथा व्यापारी आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंतही पोलिस आरोपींपर्यंत पोहोचू शकले नाहीत. आज दाखल झालेल्या पीक कर्ज प्रकरणी तत्परता दाखवत सहा जणांना अटक केली.