आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Personality Development,Latest News In Divya Marathi

पाच कर्तव्यांच्या पालनाने होतो व्यक्तिमत्त्व विकास- डॉ. शैलजा रानडे.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सध्या युवकांमध्ये व्यक्तिमत्त्व विकासाची फॅशन आल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक तरुण व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी विविध शिबिरात जातो. त्यातून खर्‍या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास होत नाही. धर्मशास्त्रात सांगण्यात आलेल्या पाच कर्तव्यांचे पालन केल्यास व्यक्तिमत्त्व विकास होतो, असे मत यवतमाळच्या डॉ. शैलजा रानडे यांनी व्यक्त केले. रामदासपेठ येथील पार्थसारथी शुक्ल मंगल कार्यालयात शनिवारी, 22 मार्चला राष्ट्रसेविका समितीतर्फे आयोजित स्व. माई उर्फ सावित्रीबाई चिपळोणकर स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या.
डॉ. शैलजा रानडे यांनी पंचमहायज्ञातून व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी पुढे सांगितले की, पालकांना त्यांच्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा म्हणून काळजी असते. व्यक्तिमत्त्व विकास झाला नाही, तर त्यांचे भविष्यात काय होईल या काळजीपोटी त्यांना विविध शिबिरात पाठवले जाते. मात्र, व्यक्तिमत्त्वाचा विकास म्हणजे नेमके काय, हे समजावून घेण्याची गरज कोणाला वाटत नाही. आपले व्यक्तिमत्त्व वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे असते. व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजात आपली असलेली ओळख. मग, ही ओळख सर्व ठिकाणी सारखी कशी असू शकते? कौटुंबिक समारंभात असलेली आपली ओळख इतर ठिकाणी भिन्न असते.
डॉक्टरांकडे आजारानुसार, तर ज्योतिषाकडे राशीनुसार व्यक्तिमत्त्व ठरते. शैक्षणिक कार्यक्रम, नोकरीच्या ठिकाणी मुलाखत देताना आपले व्यक्तिमत्त्व भिन्न असते. व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ प्रदर्शन, अशी गल्लत सध्या तरुण करतात. टापटिप राहणे म्हणजे व्यक्तिमत्त्व नव्हे. तसे असल्यास लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधी, अनेक संत यांना व्यक्तिमत्त्व नव्हते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. व्यक्तिमत्त्व दिसण्यावरून नाही, तर विचारांनी ठरत असते. धर्मशास्त्राच्या स्मृतिग्रंथातील गृह्यग्रंथात सांगण्यात आलेल्या पाच यज्ञांच्या म्हणजेच कर्तव्यांच्या आचरणाने व्यक्तिमत्त्व विकास होते. पाचही कर्तव्य जर योग्य प्रकारे पार पाडले, तर व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी इतर कोणत्या गोष्टी कराव्या लागणार नाही, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा नागपूरच्या चित्राताई जोशी यांनी व्याख्यानमाला म्हणजे प्रकाशपर्व असल्याचे मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की ज्ञान म्हणजे प्रकाश आणि व्याख्यानमालेतून आपल्याला ज्ञान मिळत असते. व्याख्यानमालेतून मिळणारी ज्ञान पुस्तकात मिळत नाही. प्रत्येक व्याख्यानातून काहीतरी नवीन शिकायला मिळते, असे त्यांनी सांगितले. मंजूषा सोनटक्के यांनी प्रास्ताविकास व्याख्यानमाला आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. ऋतुजा पाटखेडकर हिने गीत सादर केले. शुभांगी कुळकर्णी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल देशमुख यांनी, तर छाया मानोरकर यांनी आभार प्रदर्शन केले. या वेळी व्याख्यानमालेच्या संयोजिका वृंदा देशपांडे यांच्यासह समितीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.