आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Please Rereading The Masses Author Dr. Rsikanta Tidake

आता सर्वसामान्यांना वाचतं करालेखक - डॉ. र्शीकांत तिडके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘वाचकांशी बोलणारी माणसं कमी होत आहेत, ती वाढली पाहिजे. लेखकांनी त्यासाठी आपल्या कोषातून बाहेर येऊन सामान्यांशी संवाद साधला पाहिजे. या सहस्रकात कुणी महात्मा व दैवी अवतार होणार नाही, तर हे सहस्रक सामान्यांचे आहे. त्यामुळे आता सामान्यांना वाचतं करणं गरजेचं आहे. कारण वाचन माणसाला प्रवृत्त करते आणि त्यातून देशाचा विकास साधता येतो’, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक डॉ. र्शीकांत तिडके यांनी केले.

येथील शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृहात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व शिवाजी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे आयोजित तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचे गुरुवारी डॉ. तिडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात झाले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार होते. व्यासपीठावर खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, कवी विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखडे, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष भडांगे, माहिती व जनसंपर्क नागपूरचे संचालक मोहन राठोड, तिडके, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोपान सातभाई, शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. आशीष राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. तिडके पुढे म्हणाले की, वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण मातृभाषेतून करण्यात यावे, तसेच संशोधनही मातृभाषेतून व्हावे. मराठी भाषेला केवळ राज्य भाषाच नव्हे, तर ज्ञान भाषेचा दर्जा मिळावा. वाचकाला काय पाहिजे याचा विचार करून लेखकांनी लिहिले पाहिजे. वाचनालयांची उपयोगिता वाढली पाहिजे, ती प्रबोधनाची केंद्र झाली पाहिजेत, असेही ते म्हणाले.

गावोगावी ग्रंथोत्सवाचे आयोजन करून वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी व्यक्त केले. मानवी जीवनाला दिशा देण्याचे कार्य ग्रंथ करत असल्याने त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले.

महादेवराव भुईभार यांनी या वेळी भाकडकथा वाचण्यापेक्षा सत्याच्या, वास्तवाच्या जवळ घेऊन जाणारे वाचन करावे, असे आवाहन केले. वाचाल तर वाचाल हे ठीक आहे. परंतु, नेमके काय वाचले पाहिजे? तेही महत्त्वाचे आहे. घरोघरी सत्यनारायण किंवा वैभवलक्ष्मीच्या व्रताची कथा वाचून जमणार नाही, तर वाचनालयातील स्पर्धा परीक्षांच्या दालनाचा युवक-युवतींनी लाभ घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. विठ्ठल वाघ, प्राचार्य सुभाष भडांगे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात मोहन राठोड यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश विशद केला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ, सरस्वती पूजन करून डॉ. भाऊसाहेब देशमुख, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. शिवाजी महाविद्यालयातील संगीत विभागाने स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अविनाश बेलाडकर यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी आभार मानले.

दुपारच्या सत्रात ‘प्रसार माध्यमातील भाषा समाजमनावर परिणाम करते का?’ या विषयावर परिसंवाद झाला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे होते. परिसंवादात प्रसन्न जोशी, राजेंद्र हुंजे, रवी टाले यांनी सहभाग घेतला. माध्यमांचा समाजमनावर निश्चितच परिणाम होतो. तो कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक असू शकतो. केवळ प्रसिद्धी माध्यमेच परिणाम करत नाहीत, तर समाजही माध्यमांवर परिणाम करतो. त्यामुळे माध्यमे अन् समाजात संवादाची गरज आहे. हा संवाद घडल्यास समाजाला काय हवे आहे तेच माध्यमांना मांडता येईल, असा सूर परिसंवादात उमटला.