आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसमधून महिलेला केले पोलिसांनी गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून एका चार वर्षीय मुलाचे अपहरण झाल्यानंतर अपहरण करणाऱ्या महिलेला रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी दोन तासांतच अकोल्यात पकडले. मुलाचे अपहरण केल्याची कबुली महिलेने दिली आहे. पोलिसांनी मुलाला त्याच्या पित्याच्या स्वाधीन केले. ही घटना शनिवारी घडली.
शिर्डी येथून रोजगाराच्या शोधात नगर जिल्ह्यातील कर्जत येथील संतोष काळे हे त्यांच्या तीन मुलांसह शिर्डी येथे गेले होते. रेल्वेस्थानकावर अलिगड येथील मंजू मोनार (वय ३७) हिने त्यांच्याशी लगट करत त्यांचा विश्वास संपादन केला. तिने त्यास रोजगार देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर महाराष्ट्र एक्स्प्रेसने मंजू त्यांच्यासोबत प्रवासास निघाली. मात्र, मलकापूर रेल्वेस्थानक आल्यानंतर या महिलेने संतोष काळे यांची नजर चुकवून त्यांच्या चार वर्षांच्या मुलाला गाडीतून खाली उतरवले. गाडी स्टेशनहून निघून गेल्यानंतर संतोष काळे यांना मुलगा दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली. नांदुरा रेल्वेस्थानक आल्यानंतर ते गाडीतून उतरले आणि पुन्हा मलकापूर रेल्वे स्थानकावर निघून गेले. यादरम्यान मलकापूर रेल्वेस्थानकावर दुपारी 12 वाजता अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस आली. त्या गाडीमध्ये बसून ही महिला निघाली होती. मलकापूरला आल्यानंतर संतोष काळे यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आरक्षक रंजन तेलंग यांच्याकडे मुलाचे अपहरण झाल्याचे सांगितले. त्यांनी लगेच शेगाव, अकोला आरपीएफला अहमदाबाद एक्स्प्रेसमधून मुलाचे अपहरण करणारी महिला आल्याचे सांगितले. त्यानंतर आरपीएफ जवानांनी सुरक्षा तैनात केली. मात्र, नांदुरा येथून गाडीमध्ये बसलेले आरपीएफचे मोहन सावळे यांनी या महिलेला ओळखले आणि तिला अकोला येथे उतरवले.
गाडीतच बदलवले मुलाचे कपडे
अपहरणकर्त्यामहिलेने मुलाचे अपहरण केल्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून गाडीतच मुलाचे कपडे बदलवले. त्यांच्या अंगातील कपडे तिने बदलवले आणि त्याच्या अंगातील कपडे फेकून दिले. तिच्यावरही संशय येऊ नये म्हणून तिनेसुद्धा कपडे बदलवले होते.
सतर्कतेमुळे शोध
मलकापूरआरपीएफचे जवान आरक्षक रंजन तेलंग यांना सर्वप्रथम माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नांदुरा, शेगाव, जलंब आणि अकोला आरपीएफला महिलेची वर्णनात्मक माहिती दिली. त्यानंतर गाडीत बसलेले मोहन सावळे यांनी महिलेला ओळखले आणि अकोल्यात उतरवले. लगेच मुलाच्या वडिलांना घेऊन प्रवीण गुजर अकोल्यात दाखल झाले.
अपहरणाची कबुली
मंजूमोनार नावाच्या महिलेला पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपण मुलाचे अपहरण केले असून, त्याला दिल्लीला घेऊन जाणार असल्याची माहिती दिली. आरपीएफच्या जवानांनी त्या मुलाला नंतर त्याच्या वडिलाच्या स्वाधीन केले. मुलांचे अपहरण करून त्यांना विकणारी टोळी असल्याची माहिती पोलिसांनी दिली अाहे.