आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार अड्डा मारहाण प्रकरणी न्यायालयीन चौकशीची आमदार पिंपळे यांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला /पातूर /आलेगाव - अक्षय तृतीयेच्या रात्री पोलिसांनी कापशीमध्ये जुगार अड्ड्यावर कारवाईच्या नावाखाली तेथील ग्रामस्थांना अमानुष मारहाण केली. त्या घटनेचा सर्वत्र निषेध होत असताना गुरुवारी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे यांनी कापशीला भेट दिली. या वेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती जाण्ून घेतली. कापशीमध्ये घडलेली घटना दुर्देवी असल्याचे सांगून, त्यांनी या घटनेची चौकशी चार दिवसांत करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.
आबालवृद्धांना झालेल्या मारहाणीचे समर्थन करता येणार नाही. घडलेली घटना निंदनीयच आहे. त्यामुळे या घटनेला कोण जबाबदार आहे. त्याची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल मला सोमवारपर्यंत पाठवा, असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांना दिले. त्यामुळे लगेच चौकशी अधिकारी म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्याकडे चौकशीचे अधिकार दिले आहेत. या वेळी गावकऱ्यांच्या तीव्र रोषाला विशेष पोलिस महानिरीक्षकांना सामोरे जावे लागले.

आमचे झालेले नुकसान कसे भरून निघेल, आज आमच्याकडे जुगाऱ्यांचे गाव म्हणून पाहिल्या जात आहे. त्यामुळे गेलेली इज्जत आम्हाला परत द्या, अशी मागणी गावकऱ्यांनी केल्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे निरुत्तर झाले. त्यांच्यासोबत जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा होते.

तोडफोड केलेली वाहने तशीच पडून

गुरुवारी गावकऱ्यांची तोडफोड झालेली वाहने तशीच रस्त्यावर होती. १० फूट अंतरावर तोडफोड केलेली वाहने पडलेली होती. तसेच घरातील टीव्ही संच, कूलर आणि इतर सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.

गावकऱ्यांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

निरपराध नागरिकांना मारहाण करणारे पोलिस आणि त्यांना आदेश देणारे अधिकारी यांच्यावर सात दिवसांत कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी विशेष पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही पोलिसांनी मोडतोड केलेले साहित्य उचलणार नसल्याचे या वेळी सांगितले. सात दिवसांच्या आत जर कारवाई झाली नाही, तर आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करून न्याय मागणार आहोत, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

२० मिनिटांत घडले सर्वकाही

अक्षय तृतीयेच्यारात्री ११.३० वाजता आरसीपीचे जवान आणि क्युआरटीच्या एकूण १०० जवानांची कुमक कापशीत दाखल झाली. त्यांनी आरोपीच्या शोधात शोधमोहीम राबवली. या वेळी त्यांना शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वात परीविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले आणि त्यांच्या पोलिस जवानांनी घरात घुसून नागरिकांना झोडपून काढले. ही मोहीम त्यांनी २० मिनिटे राबवली.
काही राजकीय पक्षाचे नेते दाखल झाल्यानंतर मारधाड सत्र बंद झाले.ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे गृहमंत्री आहेत, त्यांच्याच जिल्ह्यात पोलिसांनी निष्पाप नागरिकांना जनावराप्रमाणे मारहाण करणे हे निंदनीय आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर शासनाचा कुठलाच वचक नसल्याचे अधोरेखित होत असून, भाजपने म्हटले होते ते हेच का "अच्छे दिन', असा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते तथा जिल्हा महासचिव प्रकाश तायडे यांनी केला. दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.