अकोला - तक्रारीचे निवारण करून तक्रारकर्ता तसेच अन्यायग्रस्तामध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र, ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदारांची तक्रार घेणे तर दूरच, पण त्यास हुसकावून लावल्या जात असल्याचे प्रकार वाढत असून, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याचा पोलिसांना विसर पडत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी दुपारी 3.10 वाजता खदान पोलिस ठाण्यात एक व्यक्ती तक्रार देण्यासाठी आला असता, त्याची तक्रार घेणे दूरच मात्र त्यास नाव, गाव, पत्ता काहीही न विचारता हुसकावून लावण्यात आले.
साहेब, ‘माझी आई वारली, मला कुणीही नाही, माझ्याच घरात अनेक वर्षांपासून काही लोक राहत आहेत, त्यांनी माझ्या घरावर पूर्णपणे कब्जा केला. आता त्यांनी मला बाहेर काढण्याचा प्रयत्न चालवला आहे, आज मला त्यांनी घरातून हाकलले, मी काय करू, घर माझे आहे, मला कुणीच नाही.
शेजार्यांना त्याचे काही घेणे-देणे नाही, घरापर्यंत चला हो’, अशी विनवणी करत सिंधी कॅम्पमधील पक्की खोली येथे राहणारा 32 वर्षीय लखन बालानी हा खदान पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसांना करतो. तेथे बसलेले पोलिस कर्मचारी त्याला येतो जा, असे म्हणून हुसकावून लावतात. त्याचे साधे नाव विचारत नाही, ना पत्ता! बाहेरच्या जगाची फारशी माहिती नसलेला तो युवक आल्या पावली जातो. पोलिस माझ्या आधी घरी पोहोचतील या आशेने तो झपाझप घरी निघतो.
मात्र, त्याला काय माहीत की पोलिस त्यांची ड्युटी बजावत आहेत म्हणून! त्याचे नाव, गाव, तो कोठे राहतो हेच पोलिसांनी टिपून घेतले नसेल तर पोलिस येतील कसे, हे त्याला काय ठाऊक. तो अजूनही पोलिसांची वाटच पाहत असेल.
ठाणेदारांच्या अनुपस्थितीत पोलिस करतात मजा : पोलिस निरीक्षक सी. टी. इंगळे हे मुंबई येथील क्राइम ब्रँचमधून बदलून आले आहेत. त्यांच्याकडे रामदासपेठ पोलिस ठाण्याचा प्रभार देण्यात आला आहे. मुंबईमध्ये काम करण्याची सवय असल्यामुळे ते कुणाला स्वस्थ बसू देत नाहीत. मात्र, साहेब ठाण्यात नसल्याची संधी साधत हीच तर आरामाची योग्य वेळ आहे, असे गृहीत धरून पोलिस कर्मचारी मस्त मजा करताना दिसतात.