आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवेदनशील केंद्रांची पोलिस अधिकार्‍यांनी केली पाहणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने जिल्ह्यात 111 मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे जाहीर केले आहे. या मतदान केंद्रांवर कॅमेर्‍यांची करडी नजर राहणार आहे. दरम्यान, शनिवारी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी संवेदनशील केंद्रांची पाहणी करून कर्मचार्‍यांना खबरदारी घेण्याच्या आवश्यक त्या सूचनाही दिल्या.

जिल्हा परिषदेच्या 53 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 106 गणांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात मतदान शांततेत व्हावे, यासाठी निवडणूक विभाग आणि पोलिस विभागाच्या बैठका झाल्या. बैठकांमध्ये संवेदनशील केंद्रांची यादी तयार करण्यात आली. त्या अनुषंगाने संवेदनशील केंद्रांवर जादा पोलिस कुमक तैनात करण्याचे नियोजनही करण्यात आले.

दरम्यान, शनिवारी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श यांनी अकोला तालुक्यातील उमरी येथील मतदान केंद्राची पाहणी केली तसेच त्यांनी संबंधित पोलिसांना खबरदारी घेण्याच्या सूचनाही दिल्या तसेच शहर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांनीही अकोला तालुक्यातील संवेदनशील केंद्रांची पाहणी केली तसेच त्यांनी सुरक्षेबाबतच्या सूचनाही दिल्या. अकोला तालुक्यात 33 केंद्रांना संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे.

असा राहील बंदोबस्त
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सुमारे दोन हजार 320 पोलिस कर्मचार्‍यांची फौज तैनात करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यात अमरावती, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले आहे तसेच राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी हिंगोली जिल्ह्यातून बोलावण्यात आली आहे तसेच दंगल नियंत्रण चार पथक इतर जिल्ह्यातून बोलावण्यात आले असून, जिल्ह्याचे चार पथक बंदोबस्तामध्ये राहणार आहेत.