आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार अड्डा प्रकरण : गृहराज्य मंत्र्यांची प्रतीक्षा, सामान रस्त्यावरच पडून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कापशी येथे अक्षयतृतीयेच्या रात्री पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. या वेळी पोलिसांवर जुगाऱ्यांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी बदल्याची भावना घेत कापशी येथील निरपराध आबालवृद्धांना बेदम मारहाण केली होती. तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांचे नातेसंबंध कापशीत असताना येथील नागरिक त्यांची वाट पाहून अाहेत. त्यामुळे त्यांनी गावातील तोडफोड झालेले साहित्य अद्यापही उचलले नाही.
शुक्रवारी खासदार संजय धोत्रे यांनी कापशीला भेट दिली. या वेळी कापशीवासीयांनी त्यांच्याकडे पोलिसांच्या अत्याचाराचा पाढाच वाचला. खासदारांनी गावाची पाहणी केल्यानंतर पोलिसांचा निषेध करत आपण राज्य सरकारला याबाबत सविस्तर सांगणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. पोलिसांच्या या कृत्यामुळे भाजप सरकारची बदनामी होत अाहे. त्यामुळे अशा पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस आपण करणार असून, कापशीवासीयांना न्याय मिळवून देणार असल्याचे ते या वेळी म्हणाले. महिला, मुले आणि वृद्ध यांच्या भावना या वेळी खासदारांनी जाणून घेतल्या. जोपर्यंत या घटनेला जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरील सामान उचलणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

विरोधीपक्ष नेता धनंजय मुंडेनी घेतली दखल

संपूर्ण राज्यभर पोलिसी अत्याचाराची चर्चा होत अाहे. त्याची दखल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. त्यांनी आज कापशीमध्ये पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचे खापर राज्य सरकारवर फोडले आहे. पोलिसांची दंडेलशाही हे राज्य सरकारचे अपयश आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आज गृहराज्यमंत्र्यांची भेट

गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील हे शनिवारी अकोल्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर ते कापशी येथे रवाना होणार आहेत. कापशीला पोलिसांनी गावकऱ्यांना केलेल्या मारहाणीबाबत ते सविस्तर जाणून घेणार अाहेत.
घटनेच्या दिवशी येथील काही नागरिकांनी आम्ही गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे नातेवाईक आहोत, असे सांगितल्यानंतरही त्यांना पोलिसांनी मारहाण केली होती आणि आम्हाला मंत्री महोदयांनीच आदेश दिल्याचे सांगितले होते. त्यावरून आज डॉ. रणजित पाटील काय भूमिका घेतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.