आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर खंडेलवाल शोरूमला सील; अतिक्रमणही उद्ध्वस्त, कराचे थकित प्रकरण भोवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - न्यायालयातून आकारलेल्या मालमत्ता कराच्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरही जुनाच कराचा भरणा करण्याचे प्रकरण शहरातील प्रतिष्ठित म्हणून गणल्या जाणाऱ्या खंडेलवाल मारुती-सुझुकी शोरूमला भोवले. पूर्व पश्चिम समासात विनापरवानगीने उभारलेले टिनशेड तसेच सर्व्हिस गल्लीतील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने उद्ध्वस्त करून शोरूमला सील ठोकले आहे. महापालिकेच्या या मोठ्या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

रतनलाल प्लॉट चौक भागात वसंत खंडेलवाल आणि शारदादेवी खंडेलवाल यांच्या मालकीचे दोन व्यापारी संकुल आहे. या संकुलात खंडेलवाल मारुती-सुझुकीचे शोरूम आहे. या शोरूमवर महापालिकेने १२ हजार रुपये महिना या दराने कर आकारणी केली होती. यानुसार एका इमारतीवर ४९ हजार तर दुसऱ्या इमारतीवर ६९ हजार रुपये कर आकारणी करण्यात आली. महापालिकेच्या या कर आकारणीला खंडेलवाल शोरूमच्या संचालकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने २००६ मध्ये दिला. न्यायालयाने महापालिकेनी सुचविलेली कर आकारणी २००२ पासून गृहित धरता २००५-२००६ या आर्थिक वर्षापासून आकारावी, असा निर्णय दिला. यानुसार मालमत्ता कर विभागाने खंडेलवाल शोरूमला डिमांड बजावला.

मात्र, खंडेलवाल शोरूमच्या वतीने जुन्या पद्धतीने आकारलेल्या कर आकारणीनुसार एका इमारतीचा १८ हजार ७४५ दुसऱ्या इमारतीचा १४ हजार ३२५ रुपये कराचा भरणा करण्यात आला. या रकमेचे धनादेश संबंधितांनी दिले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही वर्ष हे धनादेश स्वीकारले, परंतु या वर्षीही खंडेलवाल शोरूमने जुन्या पद्धतीने कराचा भरणा करण्यासाठी धनादेश दिला.

मालमत्ता करवसुली कर्मचाऱ्याने हे प्रकरण सहायक आयुक्त माधुरी मडावी यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर माधुरी मडावी, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, कर अधीक्षक विजय पारतवार, नंदकिशोर बिडवे, सुरेश बोरकर, विष्णू डोंगरे आदींनी ही कारवाई केली.

कर भरण्यास वारंवार पाठपुरावा केला
-न्यायालयाच्यानिकालानंतर खंडेलवाल शोरूमला कराचा भरणा करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी जुन्याच कर आकारणीनुसार कराचा भरणा केला. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली.'' विजयपारतवार, कर अधीक्षक
कराचा भरणा करा अन्यथा कारवाई
-दहाकोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. यासाठीच थकित मालमत्ता करधारकांची यादी तयार करण्यात आली आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत थकित मालमत्ता कराची वसुली करण्याचे लक्ष केंद्रित केले आहे. ज्या मालमत्ताधारकाकडे अधिक मालमत्ता कर थकित आहे, त्या क्रमानुसार ही कारवाई केली जाईल. थकित मालमत्ता करधारकांनी थकित कराचा भरणा करावा अन्यथा कारवाई केली जाईल.'' माधुरीमडावी, सहायक आयुक्त

दहा कोटींचा कर थकित
शहरातीलविविध व्यावसायिक संकुल, निवासस्थानांकडे एकूण दहा कोटी रुपयांचा कर थकला आहे. हा थकित कर वसूल झाल्यास महापालिकेला कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन अदा करणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने थकित मालमत्ता करवसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे.

सर्व्हिस गल्लीतही अतिक्रमण
रतनलालप्लॉट चौकातील खंडेलवाल शोरूमच्या संचालकांनी शोरूमलगत असलेल्या सर्व्हिस गल्लीत अतिक्रमण करून सर्व्हिस सेंटर सुरू केले होते. तसेच पूर्व पश्चिम समासात उभारलेले टिनशेड अतिक्रमण विभागाने उद्ध्वस्त केले.

साडेनऊ लाखाचा कर थकित
खंडेलवाल शोरूमच्या संचालकांना २००५-२००६ पासून २०१४-२०१५ या आर्थिक वर्षापर्यंत त्यांनी आतापर्यंत भरलेला कर वजा करून पाच लाख ५१ हजार, तीन लाख ९५ हजार असा एकूण नऊ लाख ४६ हजार रुपयांचा कर भरण्याचे आदेश दिले होते. या थकित कराचा भरणा केल्याने महापालिकेने खंडेलवाल मारुती शोरूमला सील ठोकले. या मोठ्या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.