आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन कोटी दहा लाखांच्या निधीवरून अकोल्यात सत्तापक्षामध्ये वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महापालिकेत दोन कोटी दहा लाख रुपयांच्या रस्ते विकास निधीच्या मुद्दय़ावरून सत्तारूढ नगरसेवकांनी महापौर व उपमहापौरांना घेरल्याची माहिती मिळाली आहे. महाआघाडीच्या इतर पक्षांच्या नगरसेवकांना खुश करताना आता काँग्रेस नगरसेवकांना या निधीतून निधी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी आहे. सत्तापक्षाचे नगरसेवक आणि विरोधकांचा विरोध मंगळवारच्या सभेत दिसणार आहे. आलेल्या या निधीतून कंत्राटदारांची थकित बिले काढण्यात आल्याने काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रस्ते अनुदानासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. पण, या निधीतून कंत्राटदारांना 40 टक्के निधी देण्याचा अलिखित करार झाला. यातून शिल्लक राहिलेला निधी हा पदाधिकार्‍यांनी खर्च करावा, अशी मागणी करण्यात आली होती. पण, सत्तापक्षातील काही नगरसेवकांनी यास विरोध केल्याने हा सर्व प्रकार आता मंगळवारी महासभेसमोर येणार आहे. त्यामुळे या निधीवरून महापालिकेत आज दिवसभर मोठे राजकारण रंगले.

या निधीतून आता राष्ट्रवादीचे नगरसेवक, अकोला विकास आघाडीच्या नगरसेवकांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या प्रयत्नात या नगरसेवकांना प्रत्येकी साडेसात लाखांची कामे प्रस्तावित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पण, या सर्व घडामोडीत सत्तारूढ काँग्रेसच्या नगरसेवकांकडे पदाधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे थांबण्याची शक्यता राजकीय गोटातून व्यक्त करण्यात येत आहे. उपमहापौर रफिक सिद्दीकी यांची या सर्व प्रकरणात कोंडी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. रस्ते विकास अनुदानातून विरोधकांच्या प्रभागातील कामे होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्याचबरोबर सत्तेतील काँग्रेसच्या काही नगरसेवकांना यातून निधी मिळत नसल्याने त्यांचीसुद्धा नाराजी वाढती आहे.