आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News Balapura Constituency Issue At Akola, Divya Marathi

बाळापूर मतदारसंघात भारिपचे धक्कातंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मागील निवडणुकीत बळीराम शिरस्कार यांना अपक्ष म्हणून उभे करत भारिप-बमसंने अप्रत्यक्षपणे बाळापूर विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेतला. भारिप-बमसंच्या या खेळीमुळे काँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांना जबर धक्का बसला. भारिप-बमसं यंदाही हेच तंत्र अवलंबणार आहे. त्यामुळे इतर पक्षांची राजकीय खेळी चीत करण्याची व्यूहरचना आतापासूनच आखली जात आहे.
बाळापूर विधानसभा मतदारसंघात 1962 साली अपक्ष उमेदवाराने विजय संपादन केला. श्रीराम मानकर यांनी काँग्रेसच्या काझी सैयद गयासुद्दीन यांचा पराभव केला. सन 1967 साली काँग्रेसचे एम.ए.वैराळे विजयी झाले होते. 1972 मध्ये काँग्रेसचे गोविंदराव सरनाईक विजयी झाले. 1978 काँग्रेस (आय) चे प्रकाशचंद्र गुजराथी यांनी विजय संपादन केला. त्यांनी जनता पार्टीचे अकबर वली शेख यांना पराभूत केले. 1980 मध्ये काँग्रेसचे प्रल्हादराव खोडे यांनी विजय संपादन केला. रिपाइं खोब्रागडे गटाचे शंकरराव खंडारे यांना त्यांनी पराभूत केले. 1985 मध्ये मुस्लिम लीगचे अब्दुल्लाखान यांचा काँग्रेसचे गोवर्धन खोटरे यांनी पराभव केला. काँग्रेसच्या ताब्यातील ही विधानसभा 1990 मध्ये भाजपच्या ताब्यात गेली. भाजपचे किसनराव राऊत यांनी तिथे विजय मिळवला. त्यांनी मुस्लिम लीगचे गजी मोहम्मद अली काझी यांचा पराभव केला. 1995 भाजपचे नारायण गव्हाणकर यांनी भारिपचे सूर्यभान ढोमणे यांचा पराभव केला. पुन्हा एकदा 1999 मध्ये भाजपच्या ताब्यातील ही विधानसभा काँग्रेसच्या ताब्यात गेली. लक्ष्मणराव तायडे यांनी तिथे काँग्रेसला विजय मिळवून दिला. त्यांनी भाजप उमेदवार गव्हाणकर यांचा पराभव केला. सन 2004 मध्ये पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात ही विधानसभा गेली. नारायण गव्हाणकर यांनी भारिपचे सैयद मोहसीन यांचा पराभव केला. सन 2009 मध्ये अपक्ष बळीराम शिरस्कार यांनी विजय संपादन केला. त्यांनी भाजपच्या गव्हाणकर यांचा पराभव केला.
यंदा भाजपतर्फे या मतदारसंघात लढण्यासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.रणजित पाटील इच्छुक आहे. पण, ते आमदार असताना त्याच पदासाठी त्यांची लढत का, असा प्रश्न पक्षात विचारला जात आहे. पक्षात तेजराव थोरात, रणधीर सावरकर, मनोहर लहाने, आकाश फुंडकर यांची नावेदेखील चर्चेत आहे. नारायण गव्हाणकर काँग्रेसवासी झाल्यानंतर लोकसभेत त्यांना पक्षाने थांबण्याचा हात दाखवला होता. थांबण्याचा काही फायदा त्यांच्या पदरी पडतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. काँग्रेसचे लक्ष्मणराव तायडे किंवा त्यांचा मुलगा प्रकाश तायडे, नतिकोद्दीन खतीब, पक्षात नव्याने आलेले नितीन देशमुख, रामसिंग जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. भारिप-बमसंतर्फे येथे पुन्हा एकदा बळीराम शिरस्कार किंवा डॉ. रहेमान खान यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.