आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Akola West Zone Election Issue, Divya Marathi

अकोला पश्चिम’साठी अनेकांची मोर्चेबांधणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विधानसभेच्या गेल्या चार निवडणुकांत भाजपने अकोला पश्चिम या मतदारसंघात विजय मिळवला. भाजपचे ज्येष्ठ नेते गोवर्धन शर्मा यांनी मतदारसंघाची केलेली बांधणी हेच त्यांच्या विजयाचे गमक मानले जाते. पण, पूर्वी आपल्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघावर पुन्हा एकदा काँग्रेस ताबा मिळवण्यास इच्छुक आहे. त्यासाठी त्यांना भारिप-बमसंची साथ मिळेल की नाही, असा प्रश्न राजकीय वतरुळात चर्चिला जात आहे.
अकोला विधानसभा मतदारसंघ म्हणूनच पूर्वी या मतदारसंघाची ओळख होती. या मतदारसंघात सन 1962 मध्ये काँग्रेसचे मधुसूदन वैराळे यांनी जनसंघाच्या हरिहर पुराडउपाध्ये यांना पराभूत केले होते. त्यानंतर झालेल्या 1967 च्या निवडणुकीत काँग्रेसचे जमनालाल गोयनका यांनी जनसंघाचे एम. यू. लहाने यांना पराभूत केले, तर त्यानंतर सन 1972 मध्ये झालेल्या निवडणुकीत रिपाइंचे तुकाराम मेर्शाम यांचा पराभव जमनालाल गोयनका यांनी केला. सन 1978 मध्ये झालेल्या निवडणुकीत मोहम्मद अजहर हुसेन यांनी जनता पार्टीच्या प्रमिला जैन यांचा पराभव केला. सन 1978 प्रमाणेच सन 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत अजहर हुसेन विजयी झाले. सन 1985 मध्ये काँग्रेस उमेदवार रामदास गायकवाड यांनी मुस्लिम लीगच्या काझी मोहम्मद अली यांना पराभूत केले भाजप उमेदवार तिसर्‍या स्थानावर राहिला. 1990 मध्ये काँग्रेस उमेदवार अरुण दिवेकर यांनी शिवसेनेचे उमेदवार दीपक केळकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या चार निवडणुकीत अर्थात 1995, 1999, 2004 व 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार गोवर्धन शर्मा यांनी विजय मिळवला.
अकोला पश्चिम मतदारसंघासाठी भाजप पुन्हा एकदा आमदार गोवर्धन शर्मा यांनाच उमेदवारी देण्यास इच्छुक आहे. तरीदेखील भाजपमध्ये अनेक इच्छुक असून, तेदेखील फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहेत. पण, पक्ष या वेळी कुठलीही रिस्क न घेता आमदार गोवर्धन शर्मा यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता अधिक आहे. गोवर्धन शर्मा यांच्याविरोधात काँग्रेस कोणाला उमेदवारी देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी यादी आहे. पण, प्रबळ दावेदारीत काँग्रेसचे झिशान हुसेन, मराठी भाषिक विजय देशमुख, हिंदी भाषिक म्हणून बबनराव चौधरी या तिघांचे नाव वरिष्ठ पातळीवर चर्चेत आहे. भारिप-बमसंतर्फे अद्याप कुणाचेही नाव चर्चेत नाही. पक्षात राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय अंतिम मानला जातो. मनसे येथे उमेदवारी देते की नाही, असा मुद्दा उपस्थित होतो. त्याचबरोबर इतर मुस्लीम पक्ष येथे कुणाला उमेदवारी देतात, याकडे सर्वांचे लक्ष राहील.