आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prakash Ambedkar News In Marathi, Election News At Akola, Divya Marathi

अकोल्यात आंबेडकर, धोत्रे आणि पटेल यांच्‍यामध्‍ये होणार तिरंगी लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- नारायण गव्हाणकर यांनी बुधवारी जेव्हा अर्ज मागे घेतल्याने आता मुख्य लढतीत दोन वेळ लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे संजय धोत्रे व भारिप-बमसंचे अँड. प्रकाश आंबेडकर यांची लढत काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्याशी आहे. भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले नारायण गव्हाणकर यांनी अर्ज मागे घेतला, त्या वेळी सर्वच प्रमुख काँग्रेस नेते त्यांच्यासोबत होते. भविष्यात काँग्रेससोबत गव्हाणकर कायम राहणार असल्याचे एकंदर चित्र होते.

गव्हाणकर हे कुणबी समाजात वैयक्तिक प्रभाव टाकणारे नेते आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर मते मिळाली असती. पण, आता त्यांच्या सर्मथकांची मते काँग्रेसला परावर्तित करण्यासाठी त्यांचा कस लागणार आहे. काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात उभे राहत बंडखोरी करत त्यांनी उमेदवारी कायम ठेवली असती, तर त्यांचे भविष्यातील राजकारण संपले असते. भाजपपासून दूर गेलेल्या गव्हाणकर यांना राजकीय कारकिर्दीसाठी काँग्रेस विश्वसनीय वाटल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. या माध्यमातून त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरूच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप उमेदवार संजय धोत्रे व भारिप-बमसंचे उमेदवार अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यात यापूर्वी लढत झाली आहे. पण, या वेळी काँग्रेसने पहिल्यांदाच मुस्लीम उमेदवार दिल्याने ही लढत तिरंगी झाली आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकी सोबत आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला तिथे किती मते मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. विधानसभा व लोकसभेत काँग्रेसला तिथे किती मते मिळतात, त्या आधारावर येथील राजकीय समीकरणे स्पष्ट होतील. गेल्या लोकसभा निवडणुकीत 2009 मध्ये भाजप उमेदवार संजय धोत्रे यांनी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब धाबेकर यांना कुठल्याच विधानसभा मतदारसंघात आघाडी घेऊ दिली नाही. पण, या वेळी परिस्थिती वेगळी आहे. बाळापूर, रिसोड, अकोट या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारास किती मते मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्याच निवडणुकीत संजय धोत्रे यांच्या विरोधात अँड. प्रकाश आंबेडकर यांनी बाळापूर व मूर्तिजापूर या विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली होती. त्यामुळे येथील राजकीय परिस्थिती व मतदार कुणाला कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. विशेष म्हणजे यावेळच्या निवडणुकीत अकोट येथील आम आदमी पक्षाचे अजय हिंगणकर रिंगणात आहे, याशिवाय अन्य तीन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात कायम आहेत. जिल्ह्यातील कुणबी व माळी समाजातील मतदार एकत्रितपणे कुणाला कौल देतात, हे येणार्‍या काळात स्पष्ट होणार असल्याने निवडणूकीत रंगत येईल.

लोकसभा निवडणुकीत कॉग्रेस नेते नारायण गव्हाणकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज बुधवारी, 26 मार्च रोजी मागे घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. यामध्ये भाजप-शिवसेना, रिपाइं महायुतीचे संजय धोत्रे, भारिप-बमसंचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे हिदायत पटेल यांचा समावेश आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे.