आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मैत्रीच्या गाठीतून जीवनात सर्वस्व प्राप्त करता येते...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्रीची साथ अनेक पैलूंनी विणलेली असते. जीवनात मैत्री आवश्यक असल्याचे सांगून आपली संस्कृती जपणाराच हा दिवस असल्याचे मत भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘फ्रेन्डशिप डे’च्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.

फ्रेन्डशिप डे’ला विरोध करणे अयोग्य आहे. विरोध करणार्‍यांच्या जीवनात मित्र किंवा प्रेमाचे व्यक्ती नाहीत का, असा टीकात्मक सवालही त्यांनी उपस्थित केला. सार्वजनिक जीवनात वावरताना कुणाशी तरी गाठ पडते, स्नेहसंबंध जुळतात. मैत्रीच्या अतूट गाठीतून जीवनात सर्वस्व प्राप्त करता येऊ शकते. कधी त्यातूनच मैत्रीचे नाते निर्माण होते. अनेकदा ती आयुष्यभर साथ देते. कठीण प्रसंगातून सावरते. भावनिक आधारही देत असते. मैत्री म्हणजे जिव्हाळा आणि प्रेम आहे. सार्वजनिक क्षेत्रात वावर असतो. सतत व्यस्तता आणि धावपळ सुरू असते. सामाजिक जीवनाचा हा भाग सोडला, तर प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनात मैत्री स्नेहबंध हे कोणाशी तरी असतातच. मैत्रीला कुठल्याही र्मयादा नसतात. एकदा माणूस आवडला, त्याचे विचार जुळले की, तो कधी मित्र म्हणून आपल्या जीवनात स्थान प्राप्त करतो, हे आपल्यालाही कळत नाही. लहानपणापासून अनेकांशी संबंध आले. अनेक मित्र होते, आहेत आणि भविष्यातही राहतील, असा ठाम विश्वासही अ‍ॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केला.

बालवयापासून तर आतापर्यंतच्या राजकीय जीवनातील सर्व मित्रांची नावे लिहितो म्हटले, तर वृत्तपत्राचे पूर्ण पान भरून जाईल. निवडक सवंगड्यांची नावे लिहिली, तर तो इतरांवर अन्याय ठरेल. त्यामुळे कोणाचाही नामोल्लेख करणे कटाक्षाने टाळतोच, असे अ‍ॅड. आंबेडकर यांनी आपल्या मित्रांबद्दल बोलताना स्पष्ट केले. राजकारणातही अनेक गाजलेल्या मैत्री आहेत. मात्र, राजकारणात कुणी कोणाचे मित्र नसतात, तर कोणी शत्रूही नसतात. मात्र, राजकारणात स्वार्थाच्या मैत्रीचे प्रमाण जास्त आहे. येथील मित्रांपासून सावधच राहावे लागते, असा मोलाचा सल्लाही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. मैत्रीने रक्ताचे नाते नसलेल्यांशीही अतूट नाते आयुष्यभरासाठी जुळते. जीवनात मैत्री अनमोल आहे. मैत्रीसंदर्भात प्रत्येकाची वेगवेगळी संकल्पना असली तरी, जीवनात जीवाला-जीव लावणारे मित्र असावे, असे प्रत्येकालाच वाटते. मैत्री जपण्यासाठी एखादा विशिष्ट दिन असावा, हीच खरी शोकांतिका आहे. प्रत्येकाने जीवनात मैत्री जोपासणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.

माझ्या मते मैत्री

मैत्रीतूनच प्रेम, जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते. त्यामुळे मैत्री जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर,
राष्ट्रीय अध्यक्ष, भारिप-बहुजन महासंघ

शब्दांकन : प्रबोध देशपांडे, अकोला